पाणीपट्टी वाढीला स्थगिती
रत्नागिरी : गटविकास अधिकाऱ्यांच्या पत्राला अनुसरून कुवारबाव ग्रामपंचायतीने पाणीपट्टी वाढ स्थगित केली आहे. त्यामुळे गाव विकास आघाडीचे समन्वयक सतेज नलावडे यांनी पाणीपट्टीवाढीच्या विरोधात सुरू असलेले उपोषण स्थगित केल्याची माहिती दिली आहे.
एस. टी. सुरू करण्याची मागणी
देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील ऐतिहासिक प्रचितगडाच्या दुर्गम परिसरातील जनतेसाठी थेट रत्नागिरीसाठी एस. टी. सुरू करावी, अशी मागणी अशोकराव जाधव यांनी केली आहे. सध्या शृंगारपूर - कातुर्डी एस. टी. सुरू असून, ती संगमेश्वरला येते. जर तीच गाडी शृंगारपूर - नायरी - रत्नागिरी अशी सुरू झाली तर परिसरातील प्रवाशांची गैरसेाय दूर होणार आहे.
एस. टी. सुरू
खेड : कोकण विकास समितीच्या प्रयत्नाने नालासोपारा - खेड बसफेरी नुकतीच सुरू झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. ही बसफेरी तुळशी-विन्हेरेमार्गे धावणार आहे. नालासोपारा येथून सकाळी ८ वाजता तर खेड स्थानकातून रात्री ८ वाजता ही बस सुटणार आहे.
कोरोना केंद्राला उपकरणे भेट
चिपळूण : नगर परिषद व अपरांत हाॅस्पिटलतर्फे उभारलेल्या कोरोना केंद्राला डाऊ इंडियातर्फे पाच आयसीयू बेड, हायब्रीड व्हेंटिलेटर, डिफीब्रिलेटर, बायपॅप मशीन, सक्शन मशीन, इसीजी मशीन, ३ मल्टीपॅरामाॅनिटर, ईसीजी ट्राॅली, आदी वैद्यकीय साहित्याची भेट देण्यात आली आहे.
दरवाढीचा निर्णय
राजापूर : वाढत्या महागाईमुळे यावर्षी गणेशमूर्तींच्या किमतीमध्ये वाढ करण्याचा निर्णय राजापुरातील श्री गणेश मूर्तिकार संघटनेने घेतला आहे. राजापुरातील श्री गणेश मूर्तिकार संघटनेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या चार वर्षांत गणेशमूर्तींच्या किमतीत वाढ करण्यात आली नव्हती.
‘बार्टी’तर्फे वृक्षारोपण
देवरूख : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणेतर्फे आशिष कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमेश्वर तालुक्यातील विविध भागात वृक्षारोपण करण्यात आले. ताम्हाणे ग्रामपंचायत येथे झालेल्या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते युयूत्सू आर्ते यांची प्रमुख उपस्थिती होती.
निवृत्तीवेतन अनियमित
आरवली : जिल्ह्यातील ग्रामीण पाणी पुरवठा प्रादेशिक योजनेवरील कामगारांना मार्च २०२१पासूनचे वेतन व दहा महिन्यांचे निवृत्तीवेतन न मिळाल्याने कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. शिवाय सेवेत कार्यरत असणाऱ्या कामगारांना पाच महिन्यांचे वेतन प्राप्त झालेले नसल्याने कर्मचाऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
मार्ग निवाऱ्याची दुरवस्था
देवरूख : शहरातील पंचायत समितीजवळ उभारण्यात आलेली प्रवासी निवारा शेड कोसळली असून, ती त्वरित दुरूस्त करण्याची मागणी संगमेश्वर तालुका समविचारी संघातर्फे करण्यात आली आहे. दोन वर्षांपूर्वी ही शेड बांधण्यात आली होती. मे महिन्यात वृक्ष कोसळल्याने शेडचे छप्पर पडले आहे.
आरोग्यरक्षकांना भेटवस्तू
देवरूख : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती, जिल्हा दक्षिण रत्नागिरीतर्फे आरोग्यरक्षकांना भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. ज्याठिकाणी वैद्यकीय सुविधा उपलब्ध नाहीत, अशाठिकाणी जनकल्याण समितीतर्फे आरोग्य पेटी ठेवण्यात आली आहे.