लांजा : लांजा तालुका काँग्रेस तालुकाध्यक्षपद काँग्रेस पक्षाच्या घटनाबाह्य असून, तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांना विश्वासात घेणे गरजेचे होते. जिल्हाध्यक्ष यांनी लोकशाही पध्दतीने तालुकाध्यक्ष यांची नियुक्ती केलेली नसल्याने हे काँग्रेस पक्षाला घातक आहे. जिल्हाध्यक्ष यांची मनमानी करत असल्याने त्यांना तातडीने जिल्हाध्यक्ष पदावरून हटवण्यात यावे, अशी मागणी तालुका काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केली. याबाबत प्रदेशाध्यक्षांकडे दाद मागितली जाणार आहे.यावेळी तालुकाध्यक्ष नुरुद्दीन सय्यद, ज्येष्ठ नेते ॲड. सदानंद गांगण, सरचिटणीस महेश सप्रे, सुनील कानडे, शहराध्यक्ष प्रसन्न शेट्ये, खलील मणेर, नगरसेवक रफिक नेवरेकर, प्रकाश लांजेकर, आदम रखांगी, मोहन दाभोळकर, सुरेश भगते उपस्थित होते. लांजा तालुकाध्यक्षपदी दोन दिवसांपूर्वीच शांताराम गाडे यांची नियुक्ती झाल्याचे पत्र देण्यात आले होते.
या निवडीला तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला आहे. काँग्रेस पक्षाच्या तालुकाध्यक्ष पदाची निवड करताना पक्षाकडून निरीक्षक पाठवला जातो. बैठक घेऊन इच्छुकांची नावे विचारात घेतली जातात. जास्त नावे असतील, तर मात्र प्रदेश कमिटीकडे नावे जाऊन प्रदेश कमिटी अंतिम निर्णय घेते. ही काँग्रेस पक्षाची निवडीची परंपरा जिल्हाध्यक्षांनी खंडित केली असून, ही निवड ठोकशाही पध्दतीने निवड केल्याचे तालुकाध्यक्ष नुरुद्दीन सय्यद यांनी सांगितले.शांताराम गाडे यांच्या निवडीला आमचा विरोध नाही. मात्र, त्यांची निवड करण्यासाठी वापरलेली पध्दत ही इतर कार्यकर्ते यांच्यावर अन्यायकारक व लोकशाहीला, काँग्रेस परंपरेला धरून नाही. याला आमचा विरोध आहे, असेही त्यांनी सांगितले. सध्या असलेले जिल्हाध्यक्ष हे हुकूमशाही पध्दतीने कारभार करीत आहेत, असा आरोप सय्यद यांनी केला.
तालुक्यात पाच ग्रामपंचायती काँग्रेस पक्षाच्या ताब्यात राहिल्या असत्या, मात्र चुकीच्या पध्दतीने केलेल्या नियुक्तीमुळे कार्यकर्ते संभ्रमात पडून हाती येणाऱ्या ग्रामपंचायती हातातून निसटून गेल्याने याला जिल्हाध्यक्ष कारणीभूत असल्याचा ठपका तालुकाध्यक्ष नुरुद्दीन सय्यद यांनी ठेवला आहे.