राजापूर : केळवली जिल्हा परिषद गटासाठी घेण्यात येणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी भरलेले सर्व अर्ज वैध ठरले आहेत. मात्र, पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म नसल्याने राष्ट्रवादीचे भरत लाड व प्रसाद मोहरकर यांची अपक्ष म्हणून गणना केली जाणार आहे.केळवली जिल्हा परिषद गटासाठी या महिन्याच्या ३० तारखेला मतदान घेण्यात येणार आहे. त्यासाठी एकूण पाच उमेदवारांनी सोमवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी सहा अर्ज दाखल केले होते. त्यामध्ये शिवसेनेचे रामचंद्र सरवणकर यांनी दोन, काँग्रेसचे दीपक बेंद्रे यांनी एक, राष्ट्रवादीचे भरत लाड, भाजपाचे सुदेश आकटे व काँग्रेसचे प्रसाद मोहरकर यांनी प्रत्येकी एक अर्ज सादर केला होता.मंगळवारी त्या अर्जांची छाननी झाली. त्यामध्ये सर्व अर्ज वैध ठरले. मात्र, दोन अर्जासमवेत त्यांच्या पक्षाचे एबी फॉर्म नसल्याने त्या उमेदवारांना अपक्ष समजले जाणार आहे. त्यामध्ये राष्ट्रवादीचे भरत लाड यांनी आपल्या पक्षातर्फे उमेदवारी दाखल केली असली तरी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जासमवेत त्यांनी पक्षातर्फे दिला जाणारा एबी फॉर्म जोडलेला नाही. त्यामुळे त्यांची उमेदवारी अपक्ष समजली जाणार आहे.२२ जून या उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या तारखेपर्यंत भरत लाड यांनी पक्षाचा एबी फॉर्म सादर केल्यास त्यांची राष्ट्रवादीचा उमेदवार म्हणून निश्चिती होऊ शकते. काँग्रेस पक्षाकडून दीपक बेंद्रे यांनी अर्ज सादर करताना पक्षाचा एबी फॉर्म समवेत सादर केला आहे. त्यामुळे त्याचीच उमेदवारी काँग्रेसची असेल, तर काँग्रेसकडून डमी म्हणून अर्ज दाखल केलेले दुसरे उमेदवार प्रसाद नारायण मोहरकर यांनीही पक्षाचा एबी फॉर्म सादर केला आहे. ते पक्षाचे मुख्य उमेदवार नसल्याने त्यांची गणना अपक्ष म्हणून केली जाणार आहे.छाननीत सर्व सहा अर्ज वैध ठरले असून, आता २२ जूनला कोण माघार घेतो, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. त्यानंतरच केळवली जिल्हा परिषद गटाच्या पोटनिवडणुकीतील खऱ्या रंगतीचा अंदाज येईल.या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी दरम्यान आघाडी व्हावी, अशी मते सुरुवातीपासून दोन्ही बाजूकडून मांडण्यात आली. जर आघाडी झालीच तर लढायचे कुणी यावर मात्र एकमत होत नव्हते. त्यासाठी रविवारी दोन्ही काँग्रेसची तालुक्यातील नेते मंडळी यांची एकत्रित बैठक झाली.केळवली जिल्हा परिषद निवडणूकीत आघाडीचा मुद्दा बैठकीत चर्चेत येताच दोन्ही बाजूचे पदाधिकारी आपापल्या बाह्या सरसावून पुढे आले . त्यामुळे आघाडीत बिघाडी तर युतीमध्येही वितुष्ट आले. त्यामुळे आता केळवली गटातील निवडणूक रंगतदार अवस्थेत पोहोचली आहे. (प्रतिनिधी)निवडणुकीकडे साऱ्यांचे लक्ष...तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य दिनेश जैतापकर यांचे सदस्यत्व रद्द झाल्याने या ठिकाणी पोटनिवडणूक होत आहे. जिल्हा परिषदेची ही पोटनिवडणूक आघाडी आणि युती फिस्कटल्याने चारही पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे आघाडी आणि युतीमधील घटक पक्षांना या निवडणुकीत स्वतंत्रपणे लढताना कोणाची ताकद किती, याचा अंदाज येणार आहे. या निवडणुकीच्या निकालाकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे
निवडणूक रंगतदार
By admin | Published: June 17, 2015 10:07 PM