दापोली : दापोली पंचायत समितीच्या सभापतिपदानंतर तालुक्यातील कुणबी फॅक्टरने दापोली शहराच्या प्रथम नागरिकाच्या पदासाठी म्हणजेच नगराध्यक्ष पदासाठी चंग बांधला आहे. त्यामुळे गेले काही दिवस कुणबी समाजातील धुरंधर प्रभागनिहाय मतांची चाचपणी करीत असल्याचे समजते.
भीतीची टांगती तलवार
देवरूख : नगरपंचायत क्षेत्रातील खालचीआळी ते मच्छीमार्केटकडे जाणारा रस्ता पावसाचे पाणी साचून पूर्णत: जलमय झाला आहे. यामुळे परिसरातील ३० कुटुंबीयांवर भीतीची टांगती तलवार कायम असून, नगरपंचायतीने आमची गंभीर परिस्थितीतून सुटका करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
काेंडिवरे येथे लसीकरण सुविधा
आरवली : देवरूख पंचायत समितीचे माजी सदस्य जाकीर शेकासन यांच्या पाठपुराव्यामुळे कोंडिवरे ग्रामपंचायत कार्यालयात लसीकरणाची सुविधा नव्याने उपलब्ध करून देण्यात आली आहे. पहिल्याच टप्प्यात १०० टक्के लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे.
पंचायत समितीची सभा तहकूब
चिपळूण : येथील पंचायत समितीची मासिक सभा शुक्रवारी ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात आली होती. मात्र, काही तांत्रिक अडचणीमुळे ती तहकूब करण्यात आली आहे. त्यामुळे ही सभा आता दि. २३ जून रोजी घेण्यात येणार आहे.
डबर वाहतुकीचा घोटाळा
देवरूख : लॉकडाऊन, संचारबंदीच्या कालावधीत सार्वजनिक वाहतुकीवरील बंदी कायम ठेवण्यात आली आहे. तरीही राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या डबराची अनधिकृत वाहतूक करुन लॉकडाऊनच्या कालावधीत झालेल्या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
सर्व्हिसरोड अपघातांचा हॉटस्पॉट
खेड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील भरणे ग्रामपंचायतीच्या हद्दीत चौपदरीकरणाचे काम करीत असताना सर्व्हिस रोडचे काम सुरू आहे. हे काम करीत असताना अत्यंत निकृष्ट दर्जाचे दर्जाहीन पद्धतीने काम केल्याने रस्ता खचून या रस्त्यावर खड्ड्याचे साम्राज्य पसरले आहे.
अँटिजन चाचणीचे प्रशिक्षण
रत्नागिरी : ग्रामीण भागातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सैतवडे गावातील आरोग्य उपकेंद्राच्या वतीने अंगणवाडी सेविकांना अँटिजन चाचणीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. वाटद प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या सैतवडे उपकेंद्राने हा उपक्रम राबविला आहे.
कामकाजावर परिणाम
चिपळूण : आपल्या विविध मागण्यांसाठी १५ जूनपासून राज्यभर पुकारलेल्या बेमुदत संपात चिपळूण तालुक्यातील २२२ आशा व ११ गटप्रवर्तकही सहभागी झाल्या आहेत. ऐन कोरोना काळातच हा संप झाल्याने कोविड संदर्भातील कामकाजावर परिणाम झाला आहे.
बेकायदेशीर माती उत्खनन
चिपळूण : शहरालगतच्या मिरजोळी दत्तवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला बेकायदेशीरीत्या मोठ्या प्रमाणात माती उत्खनन होत असल्याने पावसाळ्यात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात माती येऊन अपघात होण्याची शक्यता आहे. या उत्खननामुळे शासकीय मालमत्तेचे नुकसान होत आहे.
गोड्या पाण्यातील माशांना मागणी
दापोली : पावसाळा म्हणजे मत्स्य खवय्यांसाठी जणू पर्वणीच. पावसाळ्यात समुद्रातील मासेमारी बंद झाली आहे. परिणामी खवय्यांच्या उड्या आता गोड्या पाण्यातील मासळीवर पडत आहे. हे मासे सध्या मोठ्या प्रमाणात बाजारात उपलब्ध होत आहेत.