पावस : रत्नागिरी तालुक्यातील पावस ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत एका प्रभागामध्ये दोन माजी सरपंच रिंगणात उतरले आहेत, तर एका प्रभागामध्ये दोन सख्ख्या जाऊबाई एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या आहेत. त्यामुळे आता निवडणुकीत रंगत आली आहे.शिवसेना-भाजप समोरासमोर लढत असताना, शिवसेनेच्या दोन जागा बिनविरोध झाल्या आहेत. २०१५ च्या ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना विरुद्ध गाव पॅनेल अशी लढत झाली होती. त्यावेळी शिवसेनेला जास्त जागा मिळूनही सरपंच पदाला मुकावे लागले होते. कमी जागा असलेल्या गाव पॅनेलचे सरपंच, उपसरपंच विराजमान झाले होते. अखेर आमदारांच्या शिष्टाईनंतर दोघांनी व इतर सदस्यांनी त्यावेळी शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे सध्या शिवसेनेचे वर्चस्व आहे.पावसमधील ११ जागांसाठी आता निवडणूक होणार आहे. त्यातील प्रभाग एकमध्ये शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य व माजी सरपंच सुभाष पावसकर सरपंचपदाच्या आशेने रिंगणात उतरले आहेत. शिवसेनेकडून आपण व आपली पत्नी यांनाच उमेदवारी मिळावी, यादृष्टीने प्रयत्न केले जातात.
आजपर्यंत ग्रामपंचायत सदस्य व जिल्हा परिषद सदस्य या दोन्ही गोष्टींमध्ये त्यांचीच मक्तेदारी झाल्यामुळे इतरांना संधी मिळत नसल्याने पक्षात नाराजी पसरली आहे. त्यामुळे युवासेनेच्या कार्यकर्त्याने भाजपच्या मदतीने निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे.तसेच या प्रभागामध्ये नव्याने तेलीवाडी जोडल्यामुळे भाजपच्या माजी सरपंच व माजी पंचायत समिती सदस्य स्नेहगंधा साळुंखे पुन्हा एकदा निवडणूक लढवत आहेत. त्यांच्यासमोर शिवसेनेच्या गुरव रिंगणात आहेत. हा प्रभाग पारंपरिक शिवसेनेचा बालेकिल्ला होता. मात्र, मागील निवडणुकीत गाव पॅनेलच्या सदस्यांनी दणका दिला होता.
परंतु, येथील सदस्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे शिवसेनेचे पारडे जड झाले आहे. मागील निवडणुकीत गाव पॅनेलचे वर्चस्व असलेल्या प्रभाग ४ मध्ये शिवसेनेच्या विरोधात तीन उमेदवार उभे केले आहेत. त्यात शिवसेना व भाजपने दोन सख्ख्या जावांना एकमेकांसमोर उतरवले आहे.