मनोज मुळ््ये
रत्नागिरी : आचारसंहितेमुळे निवडणूक प्रचारातील अनेक गोष्टी बंद झाल्या आणि त्यातून अनेकांना मिळणारे उत्पन्न बंद झाले असले तरी निवडणूक आयोगाच्या नवनव्या निर्णयांमुळे अनेक व्यवसायांना उभारी मिळाली आहे. पाच वर्षांनी येणाऱ्या निवडणुकांमुळे बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात आर्थिक चलनवलन होत आहे. बदलत्या काळानुसार प्रचाराच्या पद्धतीत होणाऱ्या बदलांमुळेही अनेक नव्या प्रकारांना आर्थिक हातभार लागला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकांच्या नांंदीमुळे बाजारपेठेची चांदी झाली आहे.ज्यावेळी आचारसंहितेमधील अनेक नियमांचा काटेकोर वापर केला जात नव्हता, त्यावेळी गावागावातील असंख्य घरांच्या, कुंपणाच्या भिंती प्रचाराचे मुख्य साधन होत्या. दिवस-रात्र लाऊडस्पीकर्स लावलेल्या रिक्षा, जीप गावागावातूून प्रचार करत फिरत होत्या. आचारसंहितेचे नियम कडक करण्यात आल्यानंतर हे प्रकार पूर्णपणे थांबले. त्यामुळे या व्यवसायांना मिळणारे उत्पन्न बंद झाल्याचा मुद्दा पुढे आला. मात्र आता नव्या नियमांमुळे रोजगार-स्वयंरोजगाराच्या अनेक संधी पुढे आल्या आहेत.मतदारांच्या नावे अॅप्लिकेशनमतदारांची नावे असलेली अॅप्लिकेशन या निवडणुकीच्यानिमित्ताने बाजारात आली आहेत. ते मतदारांची यादी कार्यकर्त्यांना अँड्रॉईडवर उपलब्ध करून देतात. त्यात कोणत्याही उमेदवाराचे नाव शोधून संबंधिताला व्हॉट्सअॅपवर पाठवता येते. मतदार यादीतील जो मतदार आहे, त्याचे मत आपल्याला मिळू शकते की नाही, हे नोंदवण्याची सुविधा त्या अॅप्लिकेशनमध्ये आहे. या सुविधेचा वापर केल्यानंतर मतदान दिनी केंद्राबाहेरील बूथवर बसलेला कार्यकर्ता आपल्याला मत देणारे किती लोक येऊन गेले, याची माहितीही त्याच अॅपवर नोंदवू शकतो. रत्नागिरीतही काही पक्ष या अॅपचा वापर करत आहे. अशी अॅप्लिकेशन्स हा उत्पन्नाचा मोठा मार्ग आहे.खर्च तपासण्यासाठी तज्ज्ञांना कामप्रचारासाठी उमेदवाराकडून होणारे सर्व खर्च निवडणूक आयोगाला सादर करण्याचे बंधन आहे. ते खर्च सादर करण्याचे विहीत नमुने आहेत. या कामात कोणत्याही त्रुटी राहू नयेत, यासाठी हे काम करण्याकरिता त्या क्षेत्रातील तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे. बहुतांश ठिकाणी चार्टर्ड अकाऊंटंट यांनाच हे काम देण्यात आले आहे. त्यांचे दोन-दोन, तीन-तीन सहाय्यक त्यासाठी कार्यरत आहेत. यातून उत्पन्नाचा मोठा मार्ग उपलब्ध झाला आहे.सर्वेक्षणाला महत्त्वआपल्याला कुठे फायदा आहे, कुठे तोटा आहे, हे आजमावण्यासाठी उमेदवारांना सर्वेक्षण करून लागते. अशा एजन्सीज आता तयार झाल्या आहेत. या एजन्सीज काम घेतात आणि त्या तरूणांमार्फत सर्वेक्षण करतात. त्यातून अनेकांना रोजगार मिळत आहे.सोशल मीडिया टीमप्रत्येक राजकीय पक्ष आता अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडियाचा वापर प्रभावीपणे करत आहे. प्रत्यक्षात मेसेज पाठवण्यासाठी काही तरूणांची नियुक्तीच केली जाते. सोशल मीडिया सेल असा विभागच राजकीय पक्ष ठेवतात.तरूणांना त्यातून रोजगाराची चांगली संधी मिळाली आहे. अलिकडे या कामाला सर्वच राजकीय पक्षांकडून विशेष महत्त्व दिले जात आहे.यांनाही मिळतो आधार
- उन्हाळ्याचे दिवस असल्याने सभास्थानी मंडप लागतोच. त्यातून खूप आर्थिक चलनवलन होते.
- मतपत्रिकांच्या झेरॉक्सचे काम खूप मोठ्या प्रमाणात केले जाते. रत्नागिरी-सिंधुदुर्गात १,९५२ मतदान केंद्रे. प्रत्येक केंद्रावर एका राजकीय पक्षाचे दोन बूथ म्हणजेच मतपत्रिकांचे सुमारे चार हजार सेट. याचे झेरॉक्सवाल्यांना खूप मोठे काम मिळाले.
- पथनाट्यातून प्रचार केला जात असल्याने अनेक कलाकारांना संधी मिळाली आहे'.
- वाहनांचा वापर खूप मोठ्या प्रमाणात केला जातो. ती भाड्याने घेतली जातात. त्यांचा खर्च आणि पेट्रोलचा खर्च यातूनही खूप मोठी आर्थिक उलाढाल होते.
- जिंगल्स तसेच व्हीडिओ बनवण्याचे प्रकारही यावेळी वाढले आहेत. त्यातून असंख्य लोकांना रोजगार मिळाला आहे.