चिपळूण : ओबीसी आरक्षणाच्या नवीन अध्यादेशामध्ये ज्या काही तरतुदी आहेत, त्यानुसार जर का आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेता आल्या, तर तेही योग्य होईल, असे मत खासदार सुनील तटकरे यांनी येथे व्यक्त केले.
जिल्हा राष्ट्रवादी कार्यकारिणी बैठकी निमित्ताने सावर्डे येथे आलेल्या खासदार सुनील तटकरे म्हणाले की, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा संबंध महाराष्ट्रात तीव्रतेने मांडला गेला होता. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या नव्या अध्यादेशातील तरतुदींनुसार व्हाव्यात, त्याचबरोबर आता ज्या काही जिल्हा परिषदांच्या निवडणुका घोषित झाल्या आहेत, त्या निवडणुकाही राज्य आयोगाला विनंती करून थांबविता आल्या आणि ओबीसी आरक्षणाच्या नवीन अध्यादेशाप्रमाणे घेतल्या तर तेही योग्य ठरेल.
गेले काही दिवस ओबीसी अध्यादेशाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. पण अखेर राज्यपालांनी या अध्यादेशावर मोहर उमटविली. त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो, अशी प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली.