चिपळूण : शहरातील मोठी लोकवस्ती असलेल्या ओझरवाडी व गोवळकोट परिसरात गेले महिनाभर विजेचा खेळखंडोबा सुरू असल्याने रहिवासी पुरते हैराण झाले आहेत. दिवसातून अवघ्या एक ते दोन मिनिटांसाठी तब्बल चार ते पाच वेळा वीजपुरवठा खंडित होत आहे. वारंवार हा प्रकार सुरू असल्याने ‘वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्या कर्मचाऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
वादळवारा सुटल्यास, मुसळधार पावसात येथील महावितरणकडून शहरासह ग्रामीण भागातील वीजपुरवठा खंडित केला जातो. मात्र अशी कोणती परिस्थिती उद्भवलेली नसतानाही शहरातील ओझरवाडी व गोवळकोट परिसरात दरदिवशी वीजपुरवठा काही वेळासाठीच गायब हाेत आहे. कडक लॉकडाऊनमुळे घरी बसलेली मंडळी मनोरंजनासाठी टी.व्ही. पाहत असतात. शिवाय अन्य विद्युत उपकरणेही सुरू असतात. मात्र अचानक विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने ही उपकरणे बिघडण्याची शक्यता आहे. वारंवार खंडित होणाऱ्या या वीजपुरवठ्याबाबत काही स्थानिक रहिवाशांनी महावितरण कार्यालयाशी संपर्क साधला असता त्यांना समर्पक उत्तरे मिळत नसल्याचे सांगण्यात येत आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेऊन ओझरवाडी व गोवळकोट परिसरातच वारंवार आणि तोही केवळ एक ते दोन मिनिटांसाठी कसा वीजपुरवठा खंडित होतो, याची माहिती घेऊन त्यावर तत्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी प्रदीप साळुखे यांनी केली आहे.