आवाशी : सध्या पावसाळा सुरू असल्याने कोकणात निसर्गाने कात टाकली आहे. संपूर्ण कोकण हिरवेगार झाले असून, मोहक रूप त्यास प्राप्त झाले आहे. मात्र याचवेळी या हिरव्यागार झाडाझुडपांनी विद्युतखांब वेढले गेल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
खेड तालुक्यात आवाशी - लोटे - पिरलोटे या गावात मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गालगत औद्योगिक वसाहत उभी आहे. जागतिक मंदीचे लोण देशभर असले, तरी येथील औद्योगिक वसाहत हळूहळू विकसित होत आहे. जुन्या औद्योगिक वसाहतीसह आता महामार्गावरील पश्चिमेच्या भागात धामणदिवी हद्दीत नवनवीन कारखाने उभे राहत असल्याचे पाहावयास मिळत आहे. औद्योगिक विकास महामंडळाकडून या परिसरात रस्ते, वीज व पाणी उपलब्ध करून देण्यात आले असून अनेक नवीन कारखान्यांचे बांधकाम सुरू आहे. या नवीन औद्योगिक वसाहतीतील ‘जे’ या क्षेत्रात उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना तयार करण्यात आलेल्या रस्त्यालगत काही जुनी महावितरणची यंत्रणा कार्यान्वित आहे.
दक्षिणेकडून उत्तरेकडे असणाऱ्या औद्योगिक वसाहतीस लोटे येथील विद्युत उपकेंद्राकडे येणाऱ्या या वाहिनीच्या विद्युतखांबांना जंगलातील झाडीझुडपांनी वेढले आहे. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करताना कदाचित अपघात घडल्यास दक्षिणेस असणाऱ्या कारखान्यांना याची झळ पोहोचू शकते. परिणामी, अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे या निसर्गरम्य परिसराचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्या - जाणाऱ्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महावितरणने याची पाहणी करून भविष्यात घडणाऱ्या या अपघातास वेळीच रोखावे, अशी मागणी होत आहे.