आॅनलाईन लोकमत/शोभना कांबळेरत्नागिरी, दि. १५ :जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांच्या संकल्पनेतून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जुन्या इमारतीवर अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित वीज अटकाव यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रमुख तीन इमारतींसह ११० ते २०० मीटरचा परिसर विजेच्या संभाव्य धोक्यांपासून सुरक्षित झाला आहे. जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी ई - आॅफिसची संकल्पना सत्यात उतरवली आहे. जनतेच्या कामांचा जलदगतीने निपटारा होण्यासाठी गतिमान प्रशासन करण्याकडे त्यांची वाटचाल सुरू आहे. यासाठी काही दिवसांपूर्वीच अद्ययावत तक्रार निवारण केंद्राची निर्मितीही करण्यात आली आहे. यासाठी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित यंत्रणा राबवली जात आहे. ही यंत्रणा सुरक्षित राहणे तितकेच गरजेचे आहे.
कोकणात पावसाळापूर्व तसेच पावसाळा संपतासंपता विजेच्या गडगडाटासह जोरदार पाऊस पडतो. यावेळी संगणक, दूरध्वनी तसेच इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, विजेवर आधारित महत्त्वाच्या यंत्रणा यांना धोका होण्याची शक्यताही दिवसेंदिवस वाढू लागली आहे. अनेक ठिकाणी वीज पडण्याबरोबरच लाखोंची मालमत्ता, उपकरणे यांनाही मोठ्या प्रमाणावर हानी पोहोचत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यान्वित असलेल्या विविध वातानुकूलीत यंत्रणा, संगणक, प्रिंटर, सर्व्हर यांचे विजेपासून संरक्षण व्हावे, हा यामागील हेतू आहे. लाखो रूपयांच्या मालमत्तेसह जिल्हाधिकारी कार्यालयाबरोबरच अन्य कार्यालयांत येणाऱ्या असंख्य नागरिकांचे संरक्षण व्हावे, या उद्देशाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत ही वीज अटकाव यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जुन्या इमारतीवर १८ फूट उंचीच्या रॉडवर हे परदेशी बनावटीचे ‘ईएसई एअर टर्मिनल’ बसवण्यात आले आहे. या टर्मिनलपासून जमिनीपर्यंत तांब्याच्या तीन वाहिनींद्वारे ‘अर्थिंग सिस्टीम’ टाकण्यात आली असून, यासोबतच अर्थिंगची पट्टी टाकून हे बांधकामही सुरक्षित करण्यात आले आहे.
वीज कडकडाटावेळी २०० मीटर परिसराचे त्यापासून संरक्षण होणार असून, धोक्याच्यावेळी अगदी मोठ्या क्षमतेच्या विजेचा लोळ खेचून तो भूमिगत करण्याचे कार्य ही यंत्रणा करणार आहे. परिणामी विविध यंत्रसामुग्रींसह जीवितहानीही टळणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात बसवण्यात आलेल्या या उपकरणाचा फायदा २०० मीटर परिसरालाही होणार आहे.