चिपळूण : चिपळूण येथील आपत्ती काळात आपत्ती व्यवस्थापन निर्मूलन व पुनर्वसनाच्या सीएसआर उपक्रमाच्या अंतर्गत कोटक महिंद्रा बँक लिमिटेड आणि कोटक महिंद्रा लाइफ इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडतर्फे निर्मूलनाचे काम करण्यात आले. या दोघांनी एकत्रित स्वरूपात पूरग्रस्त भागांमध्ये पुनर्वसनपर काम केले.
कोटक महिंद्रा ग्रुपचे प्रमुख मेडिकल अधिकारी डॉ. सुहास शहा आणि कोटक महिंद्रा बँकेचे अध्यक्ष श्रीपाद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली क्रॅक फ्लड रिलिफ टीमची तत्काळ स्थापना करण्यात आली. कोटक पूर निवारण कार्याचे सभासद-केएमबीएलचे डॉ. मनोज पेंडभाजे, केएलआयचे डॉ. मांगरीश रांगणेकर, डॉ. पंकज यादव आणि नीलेश धारवटकर, डॉ. अमित पालेजा, वैद्यकीय अधिकारी, वेलनेस ग्रुप, केएमबीएल आणि केएमबीएलच्या मुंबई व चिपळूण शाखांच्या कर्मचाऱ्यांनी चिपळूण तालुक्याच्या खेर्डी, बुऱ्हाणवाडी, पेठमाप आणि मिरजोळी गावांमध्ये ‘पूर निवारण कॅम्प’ उभारले होते. याच काळात चिपळूण आणि परिसरात वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
कोटकच्या पूर निवारण कॅम्पमुळे पुरानंतर आढळलेल्या आरोग्यविषयक समस्यांपासून दिलासा मिळण्यास मदत झाली. तसेच तत्काळ सावरण्यासाठी औषधे, सॅनिटरी नॅपकिन्स, मास्क, अन्नधान्ये आणि इतर आवश्यक घरगुती वस्तू योग्य वेळी लोकांपर्यंत पोहोचल्याने चिपळूणकरांना दिलासा देण्यात मोठा हातभार मिळाला, अशी मते लीडरशिप टीमचे सभासद श्रीपाद जाधव यांनी व्यक्त केले.