शिवाजी गोरेदापोली : येथील नगर पंचायतीत सुमारे ५ कोटी ८१ लाख रुपयांचा भ्रष्टाचार करणारा रोखपाल दीपक सावंत याला अटक झाल्याने दापोलीत एकच खळबळ उडाली आहे.दीपक सावंत अपहाराच्या जाळ्यात अडकल्याने अनेक धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दापोली नगर पंचायतीचे काही नगरसेवकही यामध्ये समाविष्ट असल्याचे बोलले जात असून, तपासादरम्यान दीपक सावंत नेमके कोणाकोणाचे नावे घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर दीपक सावंत काही दिवस फरार होता. यामधल्या काळामध्ये दीपक सावंत काही राजकीय मंडळींना भेटल्याची ही दापोलीत जोरदार चर्चा सुरू आहे.सोमवारी काही मंडळीसह दीपक सावंत अचानक पोलीस स्थानकात हजर झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. पोलिसांनी अटक करून कोर्टात हजर केले असता दहा दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. त्यातून धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता आहे. या अपहार प्रकरणातील रकमेतून दीपक सावंत यांनी काही लोकांना रक्कम दिली असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. याच पैशातून काही नगरसेवक व त्यांच्या मित्र मंडळींनी परराज्याचा दौराही केल्याचे बोलले जात आहे. तसेच एका अधिकाऱ्याच्या चारचाकी वाहनासाठी दीपक सावंत यांनी बक्कळ पैसा पुरवल्याचेही चर्चिले जात आहे. या गोष्टी आता पुढे येण्याची शक्यता आहे. त्याने एकट्यानेच भ्रष्टाचार केला की यामध्ये आणखी कोणी सामील आहे, याबाबतही उलगडा होणार आहे.सद्य:स्थितीत ५ कोटी ८१ लाख रुपयांच्या अपहाराचा गुन्हा दाखल झाला असला तरी त्यात वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
दापोली नगरपंचायतीत पावणेसहा कोटींचा अपहार, तत्कालीन रोखपालास अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2022 5:32 PM