पांचाळ यांना समाजरत्न पुरस्कार
चिपळूण : तालुक्यातील कोंडये, पाचाड येथील ग्रामसेवक मंगेश पांचाळ यांची राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कारासाठी निवड झाली आहे. सांगली येथील लोकशाहीर साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे बहुउद्देशीय संस्थेतर्फे विविध राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. पांचाळ राजापूर तालुक्यातील बागवेवाडीचे रहिवासी आहेत.
आरोग्य शिबिर
रत्नागिरी : तालुक्यातील पन्हळी ग्रामस्थ मंडळातर्फे प्राथमिक कोरोना लक्षणे तपासणी शिबिर जिल्हा परिषद शाळा पन्हळी येथे आयोजित करण्यात आले होते. जयगड पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या हस्ते शिबिराचा शुभारंभ करण्यात आला. पन्हळी गावातील १७० ते १७५ ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करून मार्गदर्शन करण्यात आले.
नाविकांसाठी लस
रत्नागिरी : नॅशनल युनियन ऑफ सिफेअरर्स ऑफ इंडिया (न्यूसी)चे सरचिटणीस अब्दुल गनी सारंग यांनी भारतातील नाविकांना मोफत लस देण्याचा निर्णय घेतला आहे. नाविकांचे लसीकरण हे त्यांच्या नोकरीशी निगडित आहे. लसीकरणाअभावी नोकरीवर गंडातर येण्याचा धोका असल्याने माेफत लसीकरणाची मागणी करण्यात आली आहे.
गतिरोधकांवर पट्टे
रत्नागिरी : पावस-पूर्णगड मार्गावरील रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाले आहे. नव्याने डांबरीकरण झालेल्या बाैध्दवाडी स्टाॅपनजीक दोन्ही बाजूने गतिरोधक टाकण्यात आले आहेत. मात्र गतिरोधकांवर पट्टे नसल्याने वाहन आदळून अपघाताचा धोका वाढल्याने कुर्धे येथील तरुण मित्रमंडळातर्फे गतिरोधकांवर पांढरे पट्टे मारण्यात आले आहेत.
सवलतीची मागणी
रत्नागिरी : लाॅकडाऊनमुळे सर्वसामान्यांची आर्थिक परिस्थिती कोलमडली आहे. रोजगार, व्यवसाय बुडाल्यामुळे दैनंदिन बजेट कोलमडले असतानाच कर्जाचे हप्ते कसे भरावेत, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाकडूनही कोणताच याबाबत निर्णय न झाल्याने नैराश्य निर्माण झाले आहे.