खेड : राष्ट्रीयीकृत बँकेचे अधिकारी व कर्मचारी खेड येथील नगरपरिषद दवाखान्यात लस घेण्यासाठी रविवारी गेले हाेते. मात्र, अत्यावश्यक सेवेत येत नसल्याचे कारण देत त्यांना लस देण्याचे नाकारण्यात आले. बॅंकेत येणाऱ्या ग्राहकांची संख्या अधिक असल्याने बॅंक कर्मचाऱ्यांनाही काेराेनाची लागण हाेण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे त्यांना लस मिळणे गरजेचे आहे.
लसीकरण मोहीम सुरू झाल्यानंतर ‘फ्रंट वर्कर’ म्हणून काम करणाऱ्या आरोग्य, महसूल, ग्रामविकास, कृषी, शिक्षण व पोलीस विभागाच्या कर्मचाऱ्यांचे पहिल्या टप्प्यात लसीकरण करण्यात आले. मार्च महिन्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वेगाने वाढू लागताच पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यात आले आहे. या कालावधीत महावितरण, बँक व एस.टी.चे कर्मचारी सेवा देत आहेत. या कर्मचाऱ्यांचा संपर्क सर्वसामान्य जनतेशी येत असल्याने लसीकरण करणे आवश्यक आहे. मात्र, शासनाच्या लसीकरण मोहिमेच्या नियमाप्रमाणे हे सर्व कर्मचारी फ्रंटलाईन वर्कर या गटात येत नसल्याने या कर्मचाऱ्यांना लस उपलब्ध करून देण्यात अडचणी येत आहेत.
येथील नगरपरिषद रुग्णालयात लसीकरण मोहीम सुरू आहे. रविवारी सकाळी ९ वाजल्यापासून येथील राष्ट्रीयीकृत बँकेचे अधिकारी व कर्मचारी, एसटी कर्मचारी व महावितरण कर्मचारी लस घेण्यासाठी रांगेत उभे होते. त्यांची लस घेण्यासाठी पाळी दुपारी १ वाजता आल्यानंतर मात्र फ्रंटलाईन वर्करमध्ये येत नसल्याचे कारण देत त्यांना परत पाठवण्यात आले. याबाबत संबंधित मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्याशी संपर्क देखील साधला. मात्र त्यांनी देखील अत्यावश्यक सेवेत येत नसल्याचे कारण दिल्याने लस देण्यात आली नाही. या लसीकरणासाठी महावितरण, एस.टी., जिल्हा मध्यवर्ती बँक, एसबीआयचे अधिकारी व कर्मचारी यांनी संबंधित आस्थापनेची पत्रे घेऊन येऊनही त्यांना लस नाकारण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे.