रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील १८ रस्त्यांच्या डांबरीकरण कामाचा प्रातिनिधीक आरंभ आज (मंगळवार) सकाळी मजगाव रोड आयसीआयसीआय बॅँकेसमोरील कॉर्नरवर लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत झाला. त्यामुळे येत्या दोन ते तीन महिन्यांच्या काळात रत्नागिरीतील रस्ते गुळगुुळीत होणार आहेत. या कार्यक्रमाला नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, उपनगराध्यक्ष संजय साळवी, सेनेचे तालुकाप्रमुख बंड्या साळवी, नगरसेवक दत्तात्रय साळवी, नगरसेविका शीतल पावसकर, तन्वीर जमादार, सलील डाफळे, पल्लवी पाटील, शिल्पा सुर्वे आदी मान्यवर उपस्थित होते. गेले काही दिवस रत्नागिरी शहरातील रस्ते खड्ड्यात आकंठ बुडालेले होते. मात्र, आता ही रस्त्याची कामे सुरू झाल्याने रस्त्यांची स्थिती सुधारणार आहे.ठेकेदार व रत्नागिरी नगरपरिषद यांच्यातील वादामुळे गेल्या वर्षभरापासून रखडलेले २१ रस्त्यांचे डांबरीकरण आजपासून सुरू झाले आहे. यामध्ये दांडा फिशरिज ते साळवी स्टॉप या मुख्य रस्त्याचे ७ कोटी ९० लाख रुपये खर्चाचे काम होणार आहे. मारुती मंदिर ते नाचणादेवी मंदिरापर्यंतच्या रस्ता कामासाठी ४ कोटी, साळवी स्टॉप ते नाचणे रस्ता डांबरीकरणासाठी २ कोटी तर मारुती मंदिर ते किस्मत बेकरीपर्यंतच्या रस्त्यासाठी दीड कोटी रुपये खर्च येणार आहे. तसेच शहरातील आणखी चार रस्ते मिळून आठ रस्त्यांचे डांबरीकरण येत्या दीड महिन्यात होणे अपेक्षित आहे. उर्वरित कामे ही पावसाळ्याआधी करायची आहेत. (प्रतिनिधी)पंधरा कोटींचा निधी प्राप्तया १८ रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी १५ कोटी ३८ लाख रुपये खर्च येणार आहे. त्यातील १५ कोटींचा निधी शासनाकडून आल्याची माहिती नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी दिली. ज्या अन्य रस्त्यांचे डांबरीकरण होणार आहे, त्यात टिळकआळी, पोलीस स्टेशनसमोरील रस्ता, निवखोल घाटी रस्ता, आय. टी. आय.जवळील रस्ता, आझाद कॉलनी ते तांबटआळी, कारागृह-मच्छी मार्केट ते चर्चघाटी, एकता मार्ग ते आशियाना अपार्टमेंटपर्यंत व तेथून दिनकर पवार यांच्या घरापर्यंत, अभ्युदयनगरमध्ये ढेकणे कंपौडपर्यंत या सर्व रस्त्यांचा समावेश आहे.
रत्नागिरीत अखेर अठरा रस्त्यांची कामे सुरु
By admin | Published: February 10, 2015 10:51 PM