रत्नागिरी : जुलैअखेर जिल्ह्यामध्ये सरासरी २६३२.८० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षीपेक्षा यावर्षी जुलै अखेरपर्यंत सरासरी १,२८२ मिलिमीटर जास्त पाऊस झाला आहे. सध्या जिल्ह्यात ऊन-पावसाचा खेळ सुरू झाला आहे. अतिवृष्टी झालेल्या तालुक्यांमधील प्राथमिक अंदाजानुसार, १७८७ हेक्टर शेतीक्षेत्राचे नुकसान झाले आहे. या नुकसान झालेल्या भागातील ७० टक्के पंचनामे पूर्ण झाले असून, कृषी विभागाकडून पंचनामे करण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे, असे जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.
गेला आठवडाभर पावसाने विश्रांती घेण्यास सुरूवात केली आहे. हवामान खात्याने दि. २९ जुलै ते १ ऑगस्ट या कालावधीत जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला होता. शनिवारी सकाळी पावसाला जोरदार सुरूवात झाल्याने पाऊस दिवसभर जोर धरणार, असे वाटत होते. मात्र, थोड्याच वेळात पावसाने दडी मारली. आभाळ मात्र अंधारून आल्याने दुपारच्या वेळात जोरदार पाऊस पडेल, असे वाटत होते. मात्र, सायंकाळी उन्हाची किरणे दिसू लागली.
गेला आठवडाभर पावसाने विश्रांती घेतली आहे. शनिवारी १ जून ते जुलैअखेर जिल्ह्यात २६३२.८० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यंदा जुलैअखेर १,२८२ मिलिमीटर अधिक पाऊस झाला आहे.
ऑगस्ट महिन्यात काही प्रमाणात पावसाची गरज असते. त्यामुळे आता ऑगस्टमध्ये पावसाचे सातत्य कसे रहाणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, चिपळूण आणि खेड या दोन तालुक्यांमधील पूरपरिस्थितीनंतर प्रशासन आणि जिल्ह्यातील तसेच अन्य जिल्ह्यांतील सुमारे ५५ सामाजिक संस्था आणि कार्यकर्ते यांच्या सहकार्याने मदतकार्य सुरू आहे.
अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या ६७ गावांमधील एकूण १,३०२ कुटुंबांना १३०.२० क्विंटल गहू व तांदळाचे वाटप करण्यात आले आहे. तसेच एकूण २९ गावांमधील २१७ कुटुंबांना १०८५ लीटर केरोसीनचे वाटप करण्यात आले आहे.