रत्नागिरी : ज्यांच्यात कोरोनाची अजिबातच लक्षणे नाहीत किंवा सौम्य लक्षणे आहेत, अशांना गृह अलगीकरणात (होम आयसोलेशन) ठेवण्याच्या सूचना राज्याने दिल्या आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील ८० टक्के रुग्ण या प्रकारचे असल्याने सध्या हे रुग्ण गृह अलगीकरणात आहेत. मात्र, कोरोनाच्या पहिल्या लाटेप्रमाणे आता गृह अलगीकरणाचे नियम म्हणावे तसे कडक नसल्याने अनेक गावांतील रुग्ण आपल्या बागेतील आंबे काढण्यात मग्न असून काही गावांमधील लोकांमध्ये मिसळून गप्पाही मारत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे अनेक गावांमध्ये कोरोना वणव्यासारखा पसरू लागला आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग जिल्ह्यात वेगाने होऊ लागला आहे. एप्रिल महिना संपण्याआधीच या महिन्यातील रुग्णसंख्येने १० हजाराचा आकडा ओलांडला आहे. सध्या सक्रिय असलेल्या जवळपास चार हजार रुग्णांमध्ये ८० टक्के रुग्ण हे लक्षणे नसलेले किंवा सौम्य लक्षणे असलेले आहेत. त्यामुळे त्यांना अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. मात्र, पहिल्या लाटेप्रमाणे गृह अलगीकरणात असलेल्या व्यक्तींच्या हातावर शिक्के अथवा घरावर कोणतीच निशाणी नाही. त्याचबरोबर सध्या गावांमधील कृती दलेही यावेळी म्हणावी तशी सक्रिय नाहीत. त्यामुळे या रुग्णांना कोरोनाबाबतचे कुठलेच गांभीर्य राहिले नसून गावांमध्ये मुक्तसंचार सुरू आहे.
काही कोरोनाग्रस्त मुुंबईहून आपल्या गावी आले आहेत. सध्या आंब्याचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे ज्यांच्यामध्ये कोणतीच लक्षणे नाहीत, असे रुग्ण बिनदिक्कतपणे बागेत आंबे तोडणीसाठी जात आहेत. त्यांच्यावर कुणाचेच लक्ष नसल्याने, ही मंडळी वाडींमध्ये अथवा घरांमध्येही बिनदिक्कत फिरत आहेत. त्यामुळे या रुग्णांमध्ये लक्षणे नसली तरीही या व्यक्ती अनेकांना बाधित करीत आहेत. विशेषत: घरात असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना तसेच लहान मुलांना संसर्ग अधिक होत आहे. त्यामुळे अनेक गावेच्या गावे कोरोनाग्रस्त होऊ लागली आहेत. तसेच लक्षणे दिसत असली तरीही उपचारासाठी वेळेवर दाखल न होणाऱ्यांमध्ये मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.
अजिबात लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांकडूनच सध्या कोरोनाचा फैलाव वाऱ्यासारखा होऊ लागला आहे. त्यामुळे गावा-गावांमधील गृह अलगीकरणात असलेल्या रुग्णांवर ग्राम कृती दलाने बारीक लक्ष ठेवावे, अन्यथा कोरोना थोपविणे अवघड होईल, अशी प्रतिक्रिया अनेक गावांमधील ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
वाड्यांमध्ये रंगतायेत गप्पांचे फड...
गेल्यावेळच्या कोरोनाप्रमाणे यावेळी कोण गृह अलगीकरणात आहे, हे कळत नाही. त्यामुळे हे रुग्ण आजुबाजूच्या घरात जाऊन तासन् तास गप्पा मारत असल्याचेही काही गावांमधील ग्रामस्थांनी, आपले नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. अशा व्यक्तींमुळे गावात कोरोना पसरू लागला आहे. त्यामुळे अशा रुग्णांना काटेकोरपणे नियमांचे पालन करण्यास भाग पाडावे, असेही मत व्यक्त केले आहे.
गाव वाचविण्याची कृती दलांची जबाबदारी
गृह अलगीकरणात असलेल्यांपासून कोरोना वाढण्याचा धोका मोठ्या प्रमाणावर निर्माण झाला आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या २१ हजारपेक्षा अधिक आहे. सक्रिय रुग्णसंख्याही चार ते साडेचार हजारापर्यंत पोहोचली आहे. कोरोनाशी लढा देताना आरोग्य यंत्रणेची दमछाक होत आहे. गेले वर्षभर दिवस-रात्र अथक् प्रयत्न करून यंत्रणा रुग्णांना वाचविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मात्र, गृह अलगीकरणात असलेल्या अशा बेजबाबदार व्यक्तींमुळे पुन्हा कोरोना वाढत आहे. त्यामुळे आता प्रत्येक ग्राम कृती दलाने अशा व्यक्तींना घरातच थांबवून, कोरोना वाढण्यापासून गावाला वाचवावे, असे मतही काही गावांमधून व्यक्त होत आहे.