खेड : कोकण रेल्वे मार्गावर मुंबईहून मंगळुरूकडे जाणाऱ्या नेत्रावती एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये रेल्वे मार्गावरील नातूनगर बोगद्यानजीक सोमवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास बिघाड झाल्याने १ तास ५० मिनिटे रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती.कुर्ला लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटलेल्या नेत्रावती एक्स्प्रेसचे इंजिन नातूनगर बोगद्यानजीक बिघडले. त्यामुळे चालकाने गाडी थांबवली. याबाबतची माहिती रेल्वे प्रशासनाला दिल्यानंतर खेड स्थानकाकडून नवीन इंजिन नातूनगर येथे पाठवण्यात आले.
नवीन इंजिन जोडल्यानंतर सायंकाळी ५.४५ वाजण्याच्या सुमारास नेत्रावती एक्स्प्रेस मंगळुरूच्या दिशेने रवाना झाली. गेल्या काही दिवसांत कोकण रेल्वेकडून नववर्ष व नाताळ सणानिमित्त विशेष गाड्या धावत असून, इंजिन बंद पडल्याने अनेक गाड्या खोळंबल्या होत्या.नेत्रावती एक्स्प्रेसमधील प्रवाशांची आबाळ होऊ नये, याकरिता रेल्वे प्रशासनाकडून तातडीने खबरदारी घेण्यात आली. इंजिन बंद पडलेल्या ठिकाणी रेल्वे कर्मचाऱ्यांनी तत्काळ धाव घेऊन प्रवाशांना मदत केल्याची माहिती रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी दिली.