रत्नागिरी : स्वातंत्र्याच्या अमृतमहाेत्सवी वर्ष सांगतेनिमित्त यावर्षीही सर्वत्र ‘हर घर तिरंगा अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने रत्नागिरी शहरात ‘तिरंगा सायकल रॅली’चे आयोजन केले होते. सायकल रॅलीसाठी शहरवासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ अशा विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला.
तिरंगा सायकल रॅलीला रविवारी सकाळी ८ वाजता मारुती मंदिर येथून सुरूवात झाली. त्यानंतर नाचणे रोड, साळवी स्टॉप, मारुती मंदिर, माळनाका, जयस्तंभ, रामआळी, गाडीतळ, टिळक आळी, बंदररोड आठवडा बाजारमार्गे जयस्तंभापर्यंत बारा किलोमीटर अंतरावर रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये आठ वर्षांपासून ७० वर्षापर्यंतचे ज्येष्ठ नागरिक मिळून एकूण ११० सायकलस्वार रॅलीमध्ये सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, पोलिस निरीक्षक, नगर परिषद मुख्याधिकारी, यांचे रॅलीकरिता सहकार्य लाभल्याबद्दल क्लबतर्फे त्यांचे आभार मानण्यात आले.