रत्नागिरी : जवाहर नवोदय विद्यालय सहावीची प्रवेश परीक्षा १० एप्रिल रोजी होणार होती. मात्र, ती आता १६ मे रोजी घेण्यात येणार आहे. परीक्षेसाठी अर्ज भरलेल्या विद्यार्थी व पालकांनी या बदलाची नोंद घ्यावी, असे प्राचार्य नवोदय विद्यालय यांनी कळविले आहे.
मार्गदर्शक सूचनांची प्रतीक्षा
रत्नागिरी : दहावीच्या परीक्षा न घेता ११ वी प्रवेश घेण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला. मात्र, ११वीसाठी प्रवेशप्रक्रिया कशा पद्धतीने राबविण्यात येणार, त्यासाठी कोणत्या मार्गदर्शक सूचना दिल्या जाणार आहेत, याबाबत पालक व विद्यार्थ्यांना प्रतीक्षा लागून राहिली आहे. दहावीच्या निकालाची तारीख लवकरच घोषित केली जाणार आहे.
रक्तदान शिबीर
रत्नागिरी : तालुक्यातील चांदोर येथे हनुमान जयंतीचे औचित्य साधून युवा सेना तालुकाप्रमुख सुशांत साळवी यांच्या प्रयत्नाने गावामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जय हनुमान क्रीडा मंडळ व तळीवाडीचे ग्रामस्थांनी त्यासाठी विशेष पुढाकार घेतला होता.
घरपोच विक्रीवर भर
राजापूर : लॉकडाऊनमुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ग्राहकांची संख्या रोडावली आहे. त्यामुळे दरही बऱ्यापैकी गडगडले आहेत. कमी दरात आंबा विक्री अशक्य असल्याने शेतकऱ्यांनी घरपोच, खासगी विक्रीवर भर दिला आहे. पाच दिवसांत घरपोच हापूस विक्रीची हमी दर्शविल्याने विक्रेत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
पशुपालकांना मार्गदर्शन
गुहागर : रिलायन्स फाऊंडेशन व पशुसंवर्धन विभाग रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील पशुपालकांसाठी ऑडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जनावरांना उद्भवणाऱ्या विविध समस्या, लसीकरणाचे महत्त्व, शासकीय योजना याबाबत माहिती देण्यात आली.
विजेचा लपंडाव
खेड : उकाड्याने नागरिक हैराण असतानाच खाडीपट्ट्यातील गावांमध्ये विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे ग्राहक हैराण झाले आहेत. दिवसातून १० ते १२ वेळा वीजपुरवठा खंडित होत आहे. विजेवर चालणारी उपकरणे बंद राहत असल्याने ग्राहकांची गैरसोय होत आहे.
निधी मंजूर
खेड : तालुक्यातील जागृत शेवरोबा देवस्थानच्या सुशोभिकरणासाठी आ. योगेश कदम यांनी ७ लाखांचा निधी मंजूर केला आहे. यामुळे शेवरोबा देवस्थानचे रूपडे लवकरच पालटणार आहे. मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण, मंदिरासाठी वीजपुरवठा करण्यासाठी आवश्यक निधीदेखील दिला आहे.
मोफत बस
खेड : अठरा गाव मोरे राव परिवार संचलित श्री कुंभाळजाई देवी सामाजिक विकास संस्थेतर्फे ग्रामस्थांच्या कोरोना लसीकरणासाठी १८ गाव धवडे, बांद्री - आंबवली असा सलग सहा दिवस मोफत खासगी परिवहन सेवेचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. आंबवली प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध होणारी लस परिसरातील ग्रामस्थांना मिळावी यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
मेडिक्लेम इन्शुरन्स
रत्नागिरी : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने सुरू केलेल्या कोरोना हेल्पलाईनमध्ये जे पदाधिकारी व कार्यकर्ते फ्रंटलाईनचे कोरोना योद्धे आहेत, त्या सर्वांना १ लाख रुपयांपर्यंतचा मेडिक्लेम इन्शुरन्स पुरविण्याचा निर्णय अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी जाहीर केला आहे. तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हानिहाय हेल्पलाईन सेवा सुरू करण्यात आली आहे.
मोफत नाश्ता, जेवण
देवरुख : येथील कोरोना केंद्रातील रुग्णांसाठी देवरुख महावितरणतर्फे मदतीचा हात पुढे केला आहे. कोरोना रुग्णांसाठी महावितरणतर्फे नाश्ता, जेवण, पोषक आहार दिला जात आहे. या उपक्रमाबद्दल आरोग्य अधिकारी, तहसीलदारांनी महावितरणचे आभार मानले आहेत. लॉकडाऊन काळात आपली सेवा बजावत असतानाच सामाजिक कार्यही सुरू आहे.