लोकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : शहर, खेर्डी व परिसराला पूरपरिस्थितीचा फटका बसला. खेर्डी येथील औद्योगिक वसाहतीतील उद्योगांच्या मालमत्तेचे सुमारे ५०० कोटी रुपयांचे नुकसान झालेले असल्याने उद्योजकांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. उद्योजकांना आपले उद्योग पुन्हा नव्या जोमाने सुरू करण्यासाठी कमी व्याज दरात दीर्घ मुदतीचे कर्ज द्यावे, या मागणीसह अन्य मागण्या नॉर्थ रत्नागिरी इंडस्ट्रीज असोसिएशनने भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री खासदार अरविंद सावंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केल्या आहेत.
अतिवृष्टी आणि महापुरामुळे चिपळूण शहरासह खेर्डी, कळंबस्ते याचबरोबर १४ गावांत मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये खेर्डी औद्योगिक वसाहतीलाही चांगलाच फटका बसला असून, उद्योजकांचे मोठे नुकसान झाले आहे. खेर्डी औद्योगिक वसाहतीमधील पूरपरिस्थितीची व नुकसानाची पाहणी करण्यासाठी भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष खासदार अरविंद सावंत यांनी बुधवारी दौरा केला आणि उद्योजकांशी संवाद साधला. यावेळी नॉर्थ रत्नागिरी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अनिल त्यागी, उपाध्यक्ष गजानन कदम यांनी येथील उद्योजकांच्या नुकसानाबाबत माहिती दिली. पुरामुळे खेर्डी औद्योगिक वसाहतीमध्ये उद्योजकांचे सुमारे अडीच हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, रस्ते उखडले आहेत, पथदीप मोडून पडले आहेत. पाईपलाईन जुनी झाली असून, ती बदलायला हवी, असे त्यांनी सांगितले.
उद्योग पुन्हा सुरू करण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँकांकडून कमी व्याजदरात दीर्घ मुदतीचे कर्ज मिळावे. वीजबिलात व जीएसटीमध्ये सवलत मिळावी. आवश्यक सर्व कागदपत्रे विनाशुल्क उद्योजकांना तातडीने मिळावीत, अशा मागण्या त्यांनी केल्या आहेत.
विमा कंपन्या उद्योजकांना त्रास देत असल्याचेही या निवेदनात म्हटले आहे. यावेळी माजी केंद्रीय मंत्री खासदार अरविंद सावंत यांनी महिला उद्योजिका पूजा गजानन कदम यांच्या बेकरी, फरसाण उद्योगाला भेट देत परिस्थितीची पाहणी केली. नुकसानाबद्द्ल काळजी करू नका, आम्ही तुमच्यासोबत आहोत, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी उद्योजक शेखर कदम, तुकाराम डबाणे, विजय कदम, बी. के. पाटील, संदीप साळवी, रौफ खतीब, राहुल सावंत, शशिकांत देसाई, अहमद दलवाई, निहाल मालाणी, मदन सोळंकी तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन कदम, माजी नगरसेवक राजू देवळेकर, उदय शेटे उपस्थित होते.