दापोली : प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनविण्यावर २०१२ पासून खरेतर बंदी होती. मात्र, अंमलबजावणी होत नसल्याने उच्च न्यायालयाला कठोर भूमिका घेणे भाग पडले आहे. या निर्णयाचे पर्यावरणप्रेमींनी स्वागत केले आहे. तसेच लाल मातीच्या गणेशमूर्तींचा वापर आणि पर्यावरण पूरक विसर्जन प्रत्येकाने केल्यास निसर्गदेवता प्रसन्न होईल, असे मत रत्नागिरी जिल्हा पर्यावरण विषयी संस्था फेडरेशनचे मुख्य समन्वयक प्रशांत परांजपे यांनी व्यक्त केले आहे.
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी असूनही या मूर्तींची विक्री सुरूच आहे. या मूर्ती पर्यावरणाला घातक असल्याने त्यावर बंदी घालण्याची मागणी पर्यावरणप्रेमी संस्थांकडून करण्यात येत हाेती. त्यानंतरही या मूर्ती तयार करण्याचे काम करण्यात येत हाेते. अखेर उच्च न्यायालयाने या मूर्तींवर बंदी घालण्याचे सक्त आदेश दिले. या आदेशानंतर पर्यावरणप्रेमींनी आनंद व्यक्त केला.
न्यायालयाच्या निर्णयानंतर प्रशांत परांजपे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ते पुढे म्हणाले, गणेश विसर्जनप्रसंगी निर्माल्य हे घरच्या देवांचे निर्माल्य जेथे रोज विसर्जन करतो तेथेच करावे किंवा प्रत्येक विसर्जनस्थळी स्वतंत्र जमा करून त्याचे नैसर्गिक खत तयार करावे. तसेच पूजा साहित्याचे रॅपर, रिकाम्या कापूर डब्या या विससर्जनस्थळी नेऊ नयेत. त्या स्वतंत्र जमा करून पुनर्वापर प्रकल्पाकडे स्थानिक प्रशासनाने नियोजन करून पाठवाव्यात, असे आवाहनही प्रशांत परांजपे यांनी केले आहे.