जाकादेवी : व्यक्तीला स्वतःची काळजी घेणे शक्य होईल, तसेच गावाजवळच संस्थात्मक विलगीकरण कक्ष उभारल्यामुळे कमी लक्षणे आढळणाऱ्या रुग्णांना या विलगीकरण कक्षामुळे दिलासा मिळणार आहे, असे विलगीकरण कक्ष प्रत्येक गावपातळीवर उभारणे काळाची गरज असल्याचे मत जाकादेवी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश मोरताडे यांनी व्यक्त केले.
रत्नागिरी तालुक्यातील खालगाव-जाकादेवी परिसरातील काेराेनाची साैम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी खालगाव येथे संस्थात्मक विलगीकरण कक्ष उभारण्यात आले आहे. या कक्षाच्या उद्घाटनावेळी ते बाेलत हाेते. कोरोना रुग्णांची संख्या जाकादेवी परिसरात काही प्रमाणात आढळून येत आहे. ऐन गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर संस्थात्मक विलगीकरण केंद्र स्थापन करण्यासाठी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत, रत्नागिरी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष उदय बने तसेच गावचे सरपंच प्रकाश खोल्ये, उपसरपंच कैलास खेडेकर, व्यापारी, सेवाभावी नागरिक, विधायक संस्था, सर्व संबंधित शासकीय यंत्रणा यांचे या कक्षाच्या उभारणी कामी सहकार्य लाभले असल्याचेही डॉ. मोरताडे म्हणाले. कोरोना आजाराविषयी जनतेमध्ये भीतीचे प्रमाण कमी झाले असून, काही प्रमाणात कोरोनाची लक्षणे आढळलेल्या व्यक्तींनी घाबरून जाऊ नये, शासकीय यंत्रणेने दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन डॉ. मोरताडे यांनी केले आहे.
यावेळी लसीबाबत बोलताना ते म्हणाले की, ग्रामपंचायत पातळीवर लसीचे डोस पुरवण्यात आले आहेत. आरोग्य विभागाकडून आलेल्या लसीचे जाकादेवी व अन्य गावात नियाेजन करून लसीच्या मात्रा दिल्या जात आहेत. आपल्या परिसराची लोकसंख्या लक्षात घेऊन जास्तीत जास्त लसीचे डोस आणण्यासाठी आपला आग्रह असल्याचेही ते म्हणाले. आरटीपीसीआर चाचणी करून घेण्यासाठी ग्रामस्थांनी स्वतःहून पुढे येण्याचे आवाहनही वैद्यकीय अधिकारी डॉ. मोरताडे यांनी केले आहे.