चिपळूण : पावसाळा सुरू हाेताच तहसील कार्यालयाने मुंबई-गाेवा महामार्गावरील परशुराम घाटातील २२ कुटुंबांना स्थलांतराच्या नोटीस दिल्या आहेत. पावसाळ्याच्या तोंडावरच केवळ नोटीस दिल्या जातात, सुरक्षेच्या उपाययोजना राबवल्या जात नाहीत, असा आक्षेप घेऊन ग्रामस्थांनी या नोटीस न स्वीकारता त्या परत पाठवल्या आहेत.महामार्गावरील ३ किलोमीटर लांबीच्या परशुराम घाटातील डोंगर कटाईमुळे डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या पेढे आणि माथ्यावरील परशुराम गावातील ग्रामस्थांना धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्यात डोंगराचा भराव खाली आल्याने अनेक वेळा वाहतुकीसाठी घाट बंद केला गेला. एका बाजूला परशुरामच्या घरांना धोका आहे, तर दुसऱ्या बाजूला दरीत असलेल्या पेढेतील घरांना धोका आहे.त्यामुळे गेल्या चार वर्षांपासून स्थानिक ग्रामस्थ उपाययोजना करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे पाठपुरावा करीत आहेत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. परशुराम घाटातील चौपदरीकरणाची बहुतांशी कामे मार्गी लागली आहेत. ठिकठिकाणी संरक्षक भिंती उभारल्या असून काही ठिकाणी शिल्लक आहे. पावसाळ्यात येथे दरडी कोसळण्याचा धोका कायम आहे.पावसाळा सुरू होताच तहसील कार्यालयाने परशुराम येथील २२ ग्रामस्थांना स्थलांतराची नोटीस दिली आहे. महामार्गाचे काम सुरू झाल्यापासून ग्रामस्थांच्या संरक्षणासाठी कोणतीही उपाययोजना झाल्या नाहीत. केवळ नोटीस देऊन शासन आपली जबाबदारी झटकत असल्याने ग्रामस्थांनी बजावलेल्या नोटीस स्वीकारलेल्या नाहीत. त्यामुळे आता प्रशासनासमाेर पेच निर्माण झाला आहे.
नेमके स्थलांतरित व्हायचे काेठे?हा भाग डोंगरालगत असून, या भागात दरड कोसळून जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेच्या सर्वेक्षणानंतर अतिवृष्टी काळात संबंधित गावाचे तात्पुरते स्वरूपात स्थलांतर करण्याच्या सूचना यापूर्वीच दिल्या आहेत. हवामान खात्याकडून अलर्ट संदेश मिळाल्यानंतर कुटुंबासह त्वरित सुरक्षितस्थळी स्थलांतरित व्हावे, असे नोटीसमध्ये म्हटले आहे. मात्र, पावसाळ्याच्या स्थितीत आम्ही नेमके स्थलांतरित व्हायचे कुणीकडे याचा उल्लेख या नाेटीसमध्ये नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.