शासनाने शेतकऱ्यांना निविष्ठा खरेदीसाठी परवानगी दिली आहे. परंतु शेतकऱ्यांना वाहनात इंधन देण्यास पंपचालक नकार दर्शवित आहेत. काही पंपचालक मात्र किसान क्रेडिट कार्ड किंवा साताबारा पाहून इंधन देत आहेत. वास्तविक शेतकऱ्यांना शेती निविष्ठा खरेदीसाठी परवानगी दिली असतानाच इंधनासाठी परवानगी देणे गरजेचे होते. यांत्रिक अवजारांसाठी इंधन लागते; परंतु इंधनच उपलब्ध होत नसल्याने शेतीची कामे खोळंबत आहेत. काही पंपचालक कायद्यावर बोट ठेवत आहेत तर काही समजूतदारपणा दाखवून सातबारा ग्राह्य धरून इंधन देत आहेत. एकीकडे निकड भासताना कायदा आड येतो तर दुसरीकडे बेफिकीर वृत्तीमुळे कायद्याचा दंडुका झेलावा लागत आहे.
जिल्ह्यातील कोरोना रुग्णवाढीमुळे प्रशासनावर ताण आला आहे. ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत लाॅकडाऊन, कडक संचारबंदी जारी करण्यात येते, तेव्हा जिल्ह्यातील कोरोना पळवून लावत जनतेच्या आरोग्याची सूरक्षा हाच एकमेव उद्देश आहे. त्यासाठी प्रत्येकाने साथ देणे गरजेचे आहे. थोडेसे सामंजस्य मोलाचे आहे. शासन वारंवार ‘स्टे होम, स्टे सेव्ह’, मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंग राखा, हात धुवा असे वारंवार बजावत आहे. मात्र, गेले वर्षभर अशा प्रकारच्या सूचना एकूण कंटाळा आला असल्याने घराबाहेर हिंडणारे अधिक आहेत. मास्क तोंडला नाही तर हनुवटीला अडकून महाभाग फिरत असतात, त्यामुळे थोडीशी सावधानता सर्वांनीच बाळगणे गरजेचे आहे.
जिल्ह्यातील लाॅकडाऊन येत्या दोन दिवसांत संपणार आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार चाैथ्या टप्प्यात अनलाॅक होणार आहे. अनलाॅकमुळे हळूहळू सर्व व्यवहार रूळावर येणार आहेत. अनलाॅक झाल्यानंतरही शासकीय नियमावलींची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. लाॅकडाऊन सुरू असतानाही गेल्या पाच दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या कमी झालेली नाही. अनलाॅक घोषित केले जाणार आहे. मात्र, कोरोनाची भीती न बाळगता, प्रत्येकांने योग्य खबरदारी घेतली तर नक्कीच रुग्णसंख्येचा वाढता आलेख खाली येण्यास मदत होणार आहे.
गोरगरीब, गरजू व्यक्तींवर सध्या नोकरी, व्यवसाय नसल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे या व्यक्तींचे बाजारात खरेदीसाठी जाणे बहुधा टाळले जाते. मात्र, काही हाैशे गवशे नाहक बाजारात गर्दी करून संक्रमण फैलावण्यास मदत करतात. बेफिकीर वृत्तीमुळे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह ज्या-ज्या व्यक्तींच्या संपर्कात येतील त्यांना त्रास होतो. त्यामुळे शासनाच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. तिसरी लाट येणार असून सध्या लहान मुले बाधित होण्याचे प्रकार वाढत आहे. त्यामुळेच सावधानता तसेच योग्य खबरदारी गरजेची आहे.
- मेहरून नाकाडे