दापोली : काेराेनाच्या काळात काम करणारे फ्रंटलाईन वॉरियर्स आपला जीव धाेक्यात घालून २४ तास जनतेच्या सेवेत आहेत. या साऱ्यांच्या कामाचे काैतुक हाेत असताना स्वत:च्या जीवाची पर्वा न करता काेराेनाग्रस्त रुग्णांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करणारे मात्र दूरच राहिले आहेत. काेणताही भत्ता न घेता काम करणाऱ्या या वाॅरियर्सनाही काैतुकाची अपेक्षा आहे. ही कौतुकाची थाप मिळाली तर मोठ्या जोमाने काम करण्यासाठी बळ मिळेल, अशी अपेक्षा दापोली नगरपंचायतीच्या अस्थायी सफाई कामगारांनी बोलून दाखवली.
दापोली तालुक्यातील व्यक्तीचा शहरातील कोणत्याही कोविड सेंटरमध्ये मृत्यू झाल्यास दापोलीच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येते. हे अंत्यसंस्कार दापोली नगरपंचायतीचे सफाई कामगार आपला जीव धोक्यात घालून १२ तास करीत आहेत. अनेक जणांना लस मिळाली नाही, सानुग्रह भत्ताही नाही, त्याही परिस्थितीत संकटकाळात मोठ्या हिमतीने ते काम करत आहेत. नगरपंचायतीने कोरोनाबाधित रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी एक टीम बनविली आहे. या टीमच्या माध्यमातून दररोज ६ ते ७ लोकांवर अंत्यसंस्काराचे काम सुरू आहे.
नगरपंचायतीने आपल्या निधीतून कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कार करण्याची घेतलेली जबाबदारी माणुसकीचे दर्शन घडविणारे आहे. या नगरपंचायतीच्या सामाजिक बांधिलकीमुळे अनेक गरीब कुटुंबांना कोरोनाकाळात थोडासा दिलासा मिळणार आहे. कोरोनाने मृत्यू झाल्यावर त्या कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळतो आणि त्याच परिस्थितीमध्ये त्याला खरी गरज असते ती म्हणजे आर्थिक मदतीची. हीच गरज ओळखून दापोली नगरपंचायतीने रुग्णावंर माेफत अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला आहे. ही बाब सुखावणारी आहे.