लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : तालुक्यातील मांडकी बुद्रुक येथे तब्बल ८५ जणांना कोरोनाची बाधा झाल्याने गाव प्रशासनाकडून ‘हॉटस्पॉट’ म्हणून जाहीर करण्यात आला होता. हॉटस्पॉट ठरलेल्या या गावात कोरोनामुळे हाहाकार उडाला होता. दरम्यान, गेल्या महिन्याभरात मांडकीतील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्याने प्रशासनाने मांडकीला हॉटस्पॉटमधून वगळले आहे.
संपूर्ण गावातील लोकांची केलेली ॲन्टिजन तपासणी, ग्रामस्थांनी पाळलेले नियम आणि आरोग्य विभाग व ग्रामपंचायतीने दक्षता घेतल्याने कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात गावाला यश मिळाले आहे. मांडकी बुद्रुक बौद्धवाडीतील तिघांचा अचानक मृत्यू झाला. त्यावेळी कोरोनाचा संशय आल्याने त्यांच्या कुटुंबीयांची तपासणी केली असता, काहीजण बाधित आढळून आले. त्यामुळे ग्रामपंचायतीने आरोग्य विभागाच्या मदतीने या विषयात गांभीर्याने लक्ष घातले. संपूर्ण गावातील ग्रामस्थ, महिला व मुलांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला. या तपासणीतून तब्बल ८५ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले होते. आमदार शेखर निकम यांनी गांभीर्याने लक्ष घालत वहाळ फाटा येथील कोरोना केअर सेंटरमध्ये लक्षणे नसलेल्या रुग्णांना दाखल करण्यासाठी तातडीने पावले उचलली. कामथेसह खासगी कोविड सेंटरमध्येही बाधित रूग्णांवर उपचार करण्यात आले. महिनाभराच्या कालावधीत बाधितमधील ७ ते ८ जणांचा मृत्यू झाला. अखेर महिन्यानंतर मांडकीतील कोरोनाची परिस्थिती निवळली आहे. गावातील प्रत्येकाची चाचणी झाल्याने पुढे संसर्ग वाढला नाही. बौद्धवाडीला जास्त फटका बसल्याने ग्रामस्थांसह मुंबई मित्रमंडळाने त्यांना मोफत अन्नधान्य दिले होते. कोरोनाची स्थिती पूर्वपदावर आल्याने ग्रामस्थांनाही दिलासा मिळाला आहे.
---------------------------
एकाचवेळी मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रूग्ण आढळल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आरोग्य विभागाने वेळीच उपचार व उपाययोजना सुरू केल्याने त्यावर वेळीच नियंत्रण मिळवणे शक्य झाले. आमदार शेखर निकम यांचे सहकार्यही मोलाचे ठरले.
- अनंत खांबे, सरपंच, मांडकी बुद्रुक