चिपळूण : तालुक्यातील मिरजोळी साखरवाडी दरम्यानच्या रस्त्यावरील खड्डे अखेर भरण्यास प्रारंभ झाला आहे. या खड्डेमय रस्त्यामुळे वाढलेल्या अपघातांची दखल राष्ट्रीय महामार्ग उपविभागाने तसेच ठेकेदाराने घेतली आहे. त्यामुळे हे खड्डे डांबरखडीने बुजविण्यास प्रारंभ झाला आहे.
पोलिसांना छत्र्यांचे वाटप
राजापूर : नाटे (ता. राजापूर) येथील सागरी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी जैतापूरचे पोलीसपाटील राजप्रसाद राऊत यांच्या कार्याबद्दल त्यांनाही गाैरविण्यात आले. गेले दीड वर्ष पोलीस यंत्रणा राबत असल्याबद्द्ल या पोलीस कर्मचाऱ्यांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
भिजतच काम
दापोली : अर्धा जून महिना संपला तरी येथील नगर पंचायत प्रशासनाने सफाई कर्मचाऱ्यांना रेनकोट न दिल्याने त्यांना पावसात भिज़तच काम करावे लागत आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना तातडीने रेनकोट देण्याची मागणी नगरसेविका जया साळवी यांनी केली आहे.
धरणे भरली
साखरपा : सलग आठवडाभर झालेल्या मुसळधार पावसामुळे संगमेश्वर तालुक्यातील धरणे भरून वाहू लागली आहेत. त्यामुळे या धरणाच्या आसपास नागरिकांनी वावरताना काळजी घ्यावी, असे आवाहन लघु पाटबंधारे कार्यालयाकडून करण्यात येत आहे.