मेहरुन नाकाडे
रत्नागिरी : हॉटेल व्यावसायिक मुन्ना सुर्वे यांच्या हॉटेलमध्ये ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. श्रीराम लागू २००२ साली प्रयोगासाठी आले होते. त्यावेळी मुन्ना सुर्वे यांच्या आदरातिथ्याने भारावलेल्या डॉ. लागू यांनी शुभेच्छापर अभिप्राय स्वहस्ताक्षरात लिहिला असून, त्यामध्ये त्यांनी सुर्वे यांचे कौतुक तर केले आहेच शिवाय प्रत्येक मराठी माणसाचं प्रत्येक शहरात एक प्रभा उभारलेलं असावं, अशीही अपेक्षा व्यक्त केली आहे.
नाट्य प्रयोगाचे दौरे पाठोपाठ असल्याने कलाकारांची प्रचंड धावपळ सुरु असते. एका शहरातून दुसऱ्या शहरात ही मंडळी सतत पळत असतात. रात्री उशिरा प्रयोग संपल्यानंतर थंडगार अन्न सेवन करावे लागते. शिवाय मिळेल त्या ठिकाणी निवास करावा लागतो. परंतु, रत्नागिरीचा अनुभव हा वेगळा होता.डॉ. श्रीराम लागू यांचे देहावसान झाले असले तरी नाट्य प्रयोगांच्या माध्यमातून राज्यातील कानाकोपऱ्यात ते पोहोचले होते. २१ नोव्हेंबर २००२ साली डॉ. लागू रत्नागिरीमध्ये नाट्य प्रयोगासाठी आले होते. सातत्याने प्रयोग असल्याने कलाकार मंडळींची झोप ही टीमच्या वाहनातच होत असे. रात्रीचा प्रयोग असला तर ही मंडळी निवास व्यवस्था असलेल्या ठिकाणी विश्रांती घेतात.
डॉ. लागू रत्नागिरीमध्ये आले असता, त्यांची निवास व्यवस्था हॉटेल प्रभामध्ये करण्यात आली होती. डॉ. लागू यांनी दिवसभर विश्रांती घेणे पसंत केले. सायंकाळी प्रयोगासाठी वेळेवर नाट्यगृहात पोहोचले. प्रयोग संपल्यानंतर पुन्हा हॉटेलवर आल्यानंतर मुन्ना सुर्वे यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांना गरमागरम जेवण वाढले. त्यांचे आदरातिथ्य स्वत:हून केल्याने डॉ. लागू भारावले.जेवल्यानंतर आवर्जून डॉ. लागू यांनी सुर्वे यांच्याकडे अभिप्रायासाठी वही मागवून घेतली. त्यामध्ये त्यांनी स्वहस्ताक्षरात अभिप्राय लिहून सुर्वे यांचे कौतुक तर केलेच शिवाय त्यांना शुभाशिर्वादही दिले. त्यांच्या या अभिप्रायाने सुर्वे यांना अत्यानंद झाला. त्यांनी ती वही जपून ठेवली आहे. मात्र, डॉ. लागू यांच्या निधनानंतर आवर्जून त्यांनी लोकमतशी बोलताना डॉ. लागू यांची आठवण सांगितली.वास्तविक डॉ. लागू यांच्या रंगभूमीवरील अभिनयाला तोड नव्हती. ज्येष्ठ कलाकार म्हणून अदबीने त्यांचा उल्लेख केला जातो. सततच्या प्रयोगामुळे कलाकार मंडळींचीदेखील दमछाक होते. रंगभूमीवरील नाटकाचे सादरीकरण करण्यापूर्वी त्यांना विश्रांतीची नक्कीच गरज असते. एका शहरातून दुसऱ्या शहराकडे जात असताना अंतरही खूप असल्याने प्रवासही मोठा असतो. रस्त्यांमुळे प्रवासात फारशी झोपही होत नाही. शिवाय प्रयोग संपल्यानंतर मध्यरात्री उशिरा त्यांचा प्रवास सुरु होतो. त्यामुळे काहीवेळा दिवसभर ही कलाकार मंडळी हॉटेलच्या खोलीतून बाहेर येत नाहीत.
त्या दिवशीही (२१ नोव्हेंबर २००२) डॉ. लागूंच्या बाबतीतही असेच झाले होते. सततच्या प्रवासाने कंटाळलेल्या डॉ. लागूंनी दिवसभर खोलीत झोप काढली. प्रयोगानंतर मात्र सुर्वे यांच्याशी आवर्जून वार्तालाप साधला. त्यांची ही आठवण सुर्वे यांनी सदैव जपून ठेवली आहे. अभिप्रायाची वहीदेखील त्यांनी जपून ठेवली आहे.