रत्नागिरी : संजय राऊत यांच्यावरील आरोपांची चार्जशीट जेव्हा बाहेर येईल, तेव्हा सगळे चित्र स्पष्ट होईल, असे सूचक विधान भाजपचे माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रत्नागिरीत केले. शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांना रविवारी ईडीच्या माध्यमातून अटक करण्यात आल्यानंतर राज्यभरात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे विधान केले.रत्नागिरीतील शासकीय विश्रामगृह येथे काल, साेमवारी (१ ऑगस्ट) माजी मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेतली. संजय राऊत यांना ईडीने अटक केल्यानंतर राज्यभरांमध्ये विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपवरही आरोप केले जात होते. याला प्रत्युत्तर देताना माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, संजय राऊत यांच्यावरील आरोपांची ही चौकशी काल अचानक घडलेली नाही. पूर्वीपासूनच या प्रकरणात सातत्याने चौकशी केली जात होती.पत्राचाळमधील तब्बल ६००० जणांच्या तक्रारीनंतर ही कारवाई झाली आहे. तुमच्या बँक खात्यामध्ये थेट करोडो रुपये येत असतील आणि त्यासंदर्भात तक्रारी होत असतील तर त्याची चौकशी होणारच, असे बावनकुळे म्हणाले. जर यात काही गडबड नसेल, तुम्ही जर पैसे घेतले नसाल तर न्यायालयामध्ये ते सिद्ध होऊ शकते, ज्याला कर नाही त्याला डर कशाला, असे बावनकुळे म्हणाले.संजय राऊत यांना अटक केल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. मात्र, या प्रकरणाची चार्जशीट एकदा बाहेर आली की, त्यानंतर या प्रकरणाचे खरे स्वरूप आणि चित्र स्पष्ट होईल, असे बावनकुळे यांनी सांगितले. संजय राऊत यांच्याविरुद्ध ज्यांनी तक्रारी केल्या त्या पत्राचाळमधील तब्बल सहाशे लोकांमध्ये भाजपा नेमका कुठे आहे, असा प्रश्नही चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी केला.
चंद्रशेखर बावनकुळेंचे संजय राऊतांबद्दल सूचक विधान, म्हणाले..
By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2022 4:47 PM