लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : कोरोनामुळे दहावी पाठोपाठ बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. कोकण विभागीय मंडळाकडे १ कोटी २२ लाख ९४ हजार ४८० रुपये परीक्षा शुल्क जमा असून, विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत देण्याबाबत अद्याप कोणताच निर्णय शासनाने जाहीर केलेला नाही.
कोरोनामुळे गतवर्षी जुलैपासून शैक्षणिक सत्र सुरू झाले. मात्र, ऑनलाइन अध्यापन सुरू होते. नोव्हेंबरमध्ये प्रत्यक्ष वर्ग सुरू झाले. मार्चमध्ये परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले; परंतु कोरोना रुग्णसंख्येतील सातत्यपूर्ण वाढीमुळे परीक्षा दोन वेळा पुढे ढकलण्यात आल्या. ऑफलाइन परीक्षा घेणार असल्याचे घोषित करण्यात आले होते. मात्र, सद्य:स्थितीत विद्यार्थी सुरक्षेचा प्रश्न उद्भवला असल्याने प्रत्यक्ष परीक्षा घेणे शक्य नाही. त्यामुळे परीक्षाच रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. अंतर्गत मूल्यमापनावरून मुलांना सरसकट पास करण्यात येणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातून बारावीसाठी एकूण १८ हजार ८५ तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ९ हजार ८५७ विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरले होते. ४४० प्रमाणे परीक्षा शुल्क प्रत्येक विद्यार्थ्यास आकारण्यात आले होते. परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला आहे; परंतु परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना परत करण्याबाबत अद्याप काहीच सूचना नाहीत.
रत्नागिरी जिल्ह्यातील ७९ लाख ५७ हजार ४०० तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार लाख ३३ हजार ७ हजार ८० रुपये परीक्षा शुल्क आहे. परीक्षा रद्द करण्यात आल्याने परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना परत देण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.
बारावीचा निकाल तयार करताना दहावी की अकरावीच्या गुणांचा आधार घ्यावा याबाबत अद्याप विचार विनिमय सुरू आहे. मात्र, ऑगस्टमध्ये बारावीचा निकाल जाहीर केला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
कोट घ्यावा
शासनाने ऐनवेळी बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. मार्चमध्ये परीक्षेचे वेळापत्रक सुरुवातीला जाहीर करण्यात आले होते. त्याचवेळी कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावर परीक्षा घेता आल्या असत्या. मात्र, परीक्षा रद्द केली. परीक्षा होणार नसल्याने परीक्षा शुल्क परत करावे.
- विजय रामाणी, पालक
कोट घ्यावा
बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला आहे. निकाल तयार करण्याबाबत शासनाकडून अद्याप तरी काहीच सूचना नाहीत. शासनाच्या सूचनांची प्रतीक्षा असून, प्राप्त सूचनांची अंमलबजावणी केली जाणार आहे.
- एस. व्ही. पाटील, प्राचार्य, माँसाहेब मीनातार्ई ठाकरे कनिष्ठ महाविद्यालय, नेवरे
कोट
शासनाने बारावीच्या परीक्षा रद्द केल्या असून, निकालाबाबतच्या सूचना प्राप्त झाल्यानंतर महाविद्यालयांना पाठविण्यात येणार आहेत. परीक्षा शुल्क रद्द करण्याबाबत मात्र कोणताच निर्णय अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही.
-निशादेवी वाघमोडे, शिक्षणाधिकारी, रत्नागिरी
जिल्हा मुले मुली एकूण
रत्नागिरी ९२५२ ८८३३ १८०८५
सिंधुदुर्ग ५०७३ ४७८४ ९८५७