रत्नागिरी : कोरोना महामारीत ऑनलाईन परीक्षा हा राज्यभरातील विद्यापीठांनी पर्याय स्वीकारलेला असताना, सर्व विद्यापीठे विद्यार्थ्यांकडून परीक्षाशुल्क आकारत आहेत, हे अन्यायकारक असून, राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंनी याबाबतीत विचार करून परीक्षा शुल्क पद्धतीचा अवलंब करू नये, अशी मागणी महाराष्ट्र समविचारी मंचने केली आहे.
याबाबत समविचारीचे बाबा ढोल्ये, महासचिव श्रीनिवास दळवी, राज्य सरचिटणीस संजय पुनसकर, राज्य महिला संघटक ॲड. सोनाली कासार, राज्य संघटक ॲड. ओवेस पेचकर, जिल्हाध्यक्ष रघुनंदन भडेकर, युवाध्यक्ष नीलेश आखाडे आदींनी याप्रश्नी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे लक्ष वेधले आहे.
समविचारीच्या म्हणण्यानुसार गेली दीड वर्षे कोरोनाच्यानिमित्ताने लोकांची आर्थिक स्थिती ढासळलेली असून, मानसिक खच्चीकरण सुरू आहे. राज्यात असंख्य पालक यातून जात आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर बहुतेक विद्यापीठांनी आणि संबंधित विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा हा पर्याय स्वीकारलेला असून, त्याला अनुसरून राज्यभरात सुरळीत परीक्षा पार पडत आहेत.
परीक्षा प्रणाली ऑनलाईन होऊनसुद्धा संबंधित विद्यापीठ मात्र विद्यार्थ्यांकडून परीक्षाशुल्क आकारत आहेत, हे अयोग्य असून, विद्यापीठांनी असे शुल्क आकारू नये, अशी मागणी समविचारीने केली आहे. प्रत्यक्षात होणाऱ्या परीक्षांवेळी जो खर्च होतो, तो ऑनलाईन परीक्षांच्या माध्यमातून वाचणार आहे. प्रश्न-उत्तरपत्रिका, परीक्षा केंद्रे, सुरक्षितता, सुपरवायझर, केंद्रावरील कर्मचारी, अधिकारी, वाहने या आणि असा तत्सम् खर्च विद्यापीठ परीक्षा विभागाला येत नसल्याने विद्यापीठांनी या सर्वाचा साकल्याने विचार करून परीक्षार्थी विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेऊ नये आणि घेतले असल्यास परत करावे, असे आवाहन समविचारी मंचच्यावतीने करण्यात आले आहे.
याविषयीचे सविस्तर म्हणणे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे सादर करण्यात येणार असून, राज्यातील अनेक संघटनांनी या मागणीच्या पूर्ततेसाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांत समविचारी मंचचा समावेश केला आहे.