राजापूर : अवघ्या पाचशे ब्रास माती उत्खननाची परवानगी घेऊन राजापूर तालुक्यातील कोंड्येतील कोल्हेवाडी येथे रस्त्यालगत राजरोसपणे हजारो ब्रास मातीचे उत्खनन सुरू असताना याकडे तहसील प्रशासनाने उघडपणे डोळेझाक केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. माती उत्खननाच्या नावाखाली पूर्ण डोंगर कापला जात असताना महसूल विभाग झोपी गेला आहे का, असा संतप्त सवाल उपस्थित झाला आहे.
गेले दहा ते पंधरा दिवस रस्त्यालगत राजरोसपणे माती उत्खनन व वाहतूक होत असताना महसूल विभागाकडून कोणतीच कारवाई न झाल्याने याला प्रशासनाची मूक संमती आहे का, असा प्रश्न केला जात आहे. सर्वसामान्यांना शासकीय नियम, निकषाच्या फेऱ्यात अडकविणारे प्रशासन धनदांडग्यांबाबत एवढे उदार कसे होतात, असाही प्रश्न केला जात आहे.
कोंड्ये तर्फ सौंदळ महसुली कार्यक्षेत्रात येणाऱ्या कोंड्ये कोल्हेवाडी येथील रस्त्यालगत मागील काही दिवसांपासून पोकलेनच्या साहाय्याने डोंगराची माती खोदण्याचे काम सुरू आहे. गेले दहा ते पंधरा दिवस सतत डंपरच्या डंपर भरून माती वाहतूक केली जात आहे. याबाबत महसूल प्रशासनाकडे माहिती घेतली असता संबंधिताने ५०० ब्रास माती उत्खननाची परवानगी घेतली असल्याचे सांगण्यात आले.५०० ब्रासची परवानगी असताना प्रत्यक्षात मात्र हजारो ब्रास माती उत्खनन प्रतिदिन करण्यात येत आहे. माती उत्खननाच्या नावाखाली रस्त्यालगतचा डोंगरच कापण्यात येत आहे. त्यामुळे पर्यावरणाला हानी तर पोहोचत आहेच, शिवाय ५०० ब्रासच्या नावखाली हजारो ब्रास माती उत्खनन सुरू असल्याने लाखो रुपयांचा शासनाचा महसूलही बुडत आहे.
कोंड्येच्या मुख्य भागापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर रस्त्यालगत एवढ्या मोठ्या प्रमाणात माती उत्खनन सुरू असताना या कार्यक्षेत्रातील तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांचे त्याकडे लक्ष जात नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.