लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : पाण्याला जीवन म्हणतात. त्यामुळे जगण्यासाठी पाणी अतिशय गरजेचे आहे. मात्र, पाण्याचे प्रमाण कमी झाले तरी डिहायड्रेशन, मूत्रखडा, किडनीचे अन्य आजार उद्भवू शकतात. तसेच पाण्याचे प्रमाण गरजेपेक्षा अधिक वाढले तरीही शरीराला त्रासदायक होते. त्यामुळे शरीराला आवश्यक असेल तेवढेच पाणी प्यावे. पाण्याचे प्रमाण वय, वजन आणि आजाराचे स्वरूप यावर अवलंबून असते, असे मत आरोग्य तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.
निरोगी आयुष्यासाठी पुरेसे आणि नियमित पाणी पिणे आवश्यक असते. मात्र, काही व्यक्तींना अतिशय कमी पाणी पिण्याची सवय असते. त्यामुळे अशा व्यक्तींना डिहायड्रेशन म्हणजे शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्याने अनेक त्रास होतात. तर काहींना प्रमाणापेक्षा जास्त पाणी पिण्याची सवय असते. मात्र, गरजेपेक्षा अधिक पाणी प्यायल्यासही ते त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे अशांना वारंवार लघवीला जाणे, त्यामुळे झोपेत खंड पडणे आदी त्रास होतात. त्यामुळे पाण्याची गरज ही व्यक्तीचे वय, वजन आणि आजार असेल तर त्या आजाराचे स्वरूप यावर अवलंबून असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
शरीरात पाणी कमी पडले तर...
शरीराला नियमित आणि पुरेशा प्रमाणात पाण्याची गरज असते. मात्र, हे पाणी आवश्यकतेपेक्षा कमी झाले तर मात्र, निर्जलीकरण (डिहायड्रेशन) चा त्रास होतो. यामुळे घशाला कोरड पडणे, सतत घाम येणे, डोके - अंग दुखणे, लघवी कमी प्रमाणात व पिवळसर रंगाची होणे, जळजळ होणे, डोळ्यांमध्ये रखरखीतपणा जाणवणे, त्वचा काेरडी पडणे, चक्कर येणे, अशक्तपणा यासारखे त्रास बळावतात. त्याचबरोबर मूत्रखडा आदींसारखे मूत्राशयाचे विकारही वाढण्याचा धोका संभवतो.
शरीरात पाणी जास्त झाले तर...
निरोगी आयुष्यासाठी दिवसभरात आठ ग्लास पाणी प्यावे. साधारणत: दोन ते अडीच लीटर पाणी नियमित पिणे गरजेचे असते. पाण्याचे प्रमाण हे वातावरणावरही अवलंबून असते. आपल्या वजनामध्येही ६० टक्के पाणी असते. त्यामुळे अधिक प्रमाणात पाणी घेतल्यास आणि ते शरीरात साठून राहिल्यास रक्तातील अनेक घटक पातळ करते. त्यामुळे शरीराची हानी होऊ शकते. पाणी बाहेर टाकण्याची प्रक्रिया योग्यरित्या न झाल्यास वजन वाढण्याचा धोका वाढतो.
काेणी किती प्यावे पाणी
पाण्याचे प्रमाण व्यक्तीच्या वयावर तसेच बदलत्या वातावरणावर अवलंबून असते.
- पाण्याच्या प्रमाणाबरोबरच आपण द्रवस्वरूपात घेतले जाणारे पदार्थही लक्षात घ्यायला हवेत.
- द्रवस्वरूपातील घटक घेतल्यास पाण्याचे प्रमाण गरजेनुसार ठेवले जावे.
- १५ वर्षांपर्यतच्या मुलांनी साधारणत: एक लीटर पाणी प्यायला हवे.
- निरोगी असलेल्या व्यक्तींनी दिवसभरात दोन ते अडीच लीटर पाणी प्यावे.
- हृदयरोगी, मधुमेही यांनी दीड ते दोन लीटर पाणी प्यावे.
- व्यक्तीचे वय, उंची, वजन, व्यायामाची पद्धत, कामाचे स्वरूप आणि आजाराचे स्वरूप या गोष्टींवर पाण्याचे प्रमाण अवलंबून असते.