लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : एस.टी. महामंडळाने सुरू केलेल्या बेस्ट वाहतुकीमध्ये सप्टेंबर २० ते मार्च २१ पर्यंत रत्नागिरी विभागाने सेवा बजावली होती. मात्र महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटनेच्या मागणीनुसार पालकमंत्री अनिल परब यांनी तातडीने कार्यवाही केली आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या ‘बेस्ट’ वाहतुकीसाठी रत्नागिरी विभागातील कर्मचाऱ्यांना घाटकोपर येथे बेस्ट वाहतुकीसाठी जाण्याची सक्ती केली जात होती, याबाबत महाराष्ट्र एस.टी. कामगार विभागीय संघटनेतर्फे राज्याचे उच्च तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडे रत्नागिरी विभाग बेस्ट वाहतुकीमधून वगळण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार उदय सामंत यांनी याची दखल घेऊन परिवहनमंत्री व पालकमंत्री अनिल परब यांची भेट घेऊन रत्नागिरी विभागाला पुन्हा बेस्ट सेवेसाठी बोलविण्यात आले असल्याचे सांगून रत्नागिरी विभाग वगळण्यात यावा याबाबत चर्चा केली होती.
पालकमंत्री अनिल परब रत्नागिरी दौऱ्यावर आले असताना महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटनेचे विभागीय अध्यक्ष राजेश मयेकर, विभागीय सचिव संदेश सावंत आणि सहकारी यांनी भेट घेऊन रत्नागिरी विभाग बेस्ट वाहतुकीतून वगळण्याची विनंती केली. यावेळी पालकमंत्री परब यांनी याबाबत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री सामंत यांच्याशी चर्चा झाली असून, चार दिवसात निर्णय घेण्याचे, आश्वासन दिले होते. यावर तातडीने कार्यवाही करीत रत्नागिरी विभाग बेस्ट वाहतुकीतून वगळण्यात आल्याचे परिपत्रक महामंडळाने काढले आहे.