रत्नागिरी : येथील ज्येष्ठ रंगकर्मी दादा लोगडे यांचे दिनांक ५ नोव्हेंबर रोजी रात्री ११.३० वाजता निधन झाले. मृत्यूसमयी ते ७० वर्षांचे होते. पारावरच्या रंगभूमीपासून व्यावसायिक रंगभूमीपर्यंतचा प्रवास केलेल्या दादांनी रंगभूमी दिनीच आयुष्यातून एक्झिट घेतली.रंगभूषाकार व नेपथ्यकार म्हणून दादा लोगडे यांनी नावलौकिक मिळवला होता. दिग्दर्शकाच्या तोडीनेच नाटकाचा विचार करून नेपथ्य सजवणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते. विविध राज्य नाट्य स्पर्धांमध्ये त्यांनी पारितोषिकेही मिळवली होती.
रत्नागिरी तालुक्यातील बसणी गावचे रहिवासी असलेल्या दादांनी काही वर्षे सरपंच पदही भूषविले होते. रंगकर्मी म्हणून कार्यरत असतानाच त्यांनी शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख म्हणून कामगिरी बजावली. रत्नागिरीतील मंगलमूर्ती प्रतिष्ठानचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले.प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे पार्थिवावर शुक्रवारी दुपारी बसणी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.