प्रकाश वराडकर रत्नागिरी : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व कॉँग्रेस यांचे संयुक्त महाशिवआघाडी सरकार स्थापन होणार की अन्य कोणाचे, याबाबतचा गुंता रात्री उशिरापर्यंत कायम असल्याने जिल्ह्यात लाल दिवा येणार की नाही, याबाबत गोंधळाची स्थिती आहे. त्यामुळे इच्छुकांना कभी खुशी कभी गम असा अनुभव येत आहे.सोमवारी रात्री आठ वाजेपर्यंत शिवसेनेच्या नेतृत्त्वाखाली महाशिवआघाडी सत्ता स्थापन करण्याची आशा होती. त्यामुळे जिल्ह्यातील तीन शिवसेना आमदारांचे समर्थक उत्साहाने सरसावले होते. रत्नागिरीचे आमदार उदय सामंत आणि गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी याआधी मंत्रीपद अनुभवले आहे. त्यामुळे त्यांची नावे आणि सलग तिसऱ्यांदा निवडून आलेले म्हणून राजापूरचे आमदार राजन साळवी ही तीन नावे प्राधान्याने चर्चेत आली.गेल्या १८ दिवसांपासून सत्तेचे राजकारण वेगवेगळ्या पातळ्यांवर सुरू आहे. सत्ता स्थापनेसाठी भाजपने असमर्थता दाखवल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉँग्रेस यांचे सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. सोमवारी रात्री साडेसात वाजेपर्यंत शिवसेनेला मुदत देण्यात आली होती. त्यातच राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पाठिंब्याचे वृत्त पुढे आले आणि त्यामुळे जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये आनंद व्यक्त केला गेला.रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेने विधानसभेच्या पाचपैकी ४ जागांवर विजय मिळविला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेला दोन मंत्रीपदे मिळतील, अशी चर्चा आधीपासूनच होती. शिवसेनेचे रत्नागिरीचे आमदार उदय सामंत, राजापूरचे आमदार राजन साळवी तसेच गुहागरचे आमदार भास्कर जाधव हे तिघेजण मंत्रीपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत.रत्नागिरीचे आमदार उदय सामंत हे २०१४च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीतून शिवसेनेत दाखल होऊन विजयीही झाले. मात्र, पाच वर्षांच्या काळात सामंत यांना मंत्रीपद मिळाले नाही. विधानसभा कार्यकाळाच्या शेवटी काही महिने उरले असताना त्यांना म्हाडाचे अध्यक्षपद मिळाले. त्यामुळे दुसऱ्या टर्ममध्ये त्यांना शिवसेनेतर्फे लाल दिव्याची गाडी हमखास मिळेल, असा दावा केला जात आहे.दुसरीकडे शिवसेनेचे राजापूरचे आमदार राजन साळवी हे यावेळी मंत्रीपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. राजन साळवी यांना यावेळी मंत्रीपदापासून डावलता येणार नाही, अशी चर्चा आहे. मात्र साळवी यांना डावलले गेल्यास त्याचा शिवसैनिकांमध्ये चुकीचा संदेश जाण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. त्यामुळे साळवी यांची लाल दिव्याची गाडी पक्की मानली जात आहे.
सामंत, साळवी यांच्याबरोबरच २०१९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेनेत आलेले व विजयी झालेले आमदार भास्कर जाधव यांनाही मंत्रीपद मिळेल, असा दावा समर्थकांमधून केला जात आहे. मात्र सायंकाळी उशिराच्या घडामोडींमुळे सेना आमदारांची मंत्रीपदाची प्रतीक्षा वाढली आहे.मंत्रीपदाची प्रतीक्षा कायमएका बाजूला मंत्रीपदाची गणिते मांडली जात असताना दुसरीकडे महाशिवआघाडीची गणिते फिस्कटल्याचे चित्र तयार झाले आहे. शिवसेनेने मुदतीत दावा न केल्यामुळे त्यांना सत्तेपासून लांब राहावे लागणार आहे. त्यामुळे शिवसेना आमदारांची मंत्रीपदाची प्रतीक्षा कायम राहणार असल्याचे दिसत आहे. त्याजागी राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.शेखर निकम यांना संधी?या विधानसभा निवडणुकीत चिपळूणमध्ये किल्ला लढवित राष्ट्रवादीच्या शेखर निकम यांनी विजय मिळविला. निष्ठावान कार्यकर्ता तसेच माजी खासदार गोविंदराव निकम यांचे सुपुत्र अशी त्यांच्याबाबतची प्रतिमा आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रवादीला बळ देण्यासाठी त्यांनाही लाल दिव्याची गाडी मिळण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे.