लाेकमत न्यूज नेटवर्क
दापोली : ग्रामीण भागात झपाट्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी ‘माझी रत्नागिरी-माझी जबाबदारी’ ही मोहीम सुरू केली आहे. कोरोनावर मात करायला ही मोहीम उपयुक्त ठरेल, असा विश्वास उपविभागीय पाेलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांनी व्यक्त केला .
रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या ‘माझी रत्नागिरी-माझी जबाबदारी’ या मोहिमेचा शुभारंभ दापोलीमध्ये जालगाव ग्रामपंचायतीमध्ये करण्यात आला. यावेळी डाॅ. सुदर्शन राठाेड बाेलत हाेते. यावेळी दापोलीच्या तहसीलदार वैशाली पाटील, गटविकास अधिकारी आर. एम. दिघे, जिल्हा परिषद सदस्य चारुता कामतेकर, सरपंच श्रुती गोलांबडे, उपसरपंच बापू ऊर्फ विकास लिंगावळे, पोलीस पाटील शिंदे यांच्यासह मंडल अधिकारी सुदर्शन खानविलकर, के. बी. आंभोरे, एस. बी. साळवे, शीतल जोशी, अस्मिता धाडवे, सुप्रिया गुंदेकर, अंकिता भांबीड, स्नेहा बर्वे, रसिका राऊत, विनोद नांदीस्कर व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
ग्रामपंचायतीलगत असणाऱ्या पटेल यांच्या निवासस्थानी जाऊन या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी घरातील सर्वांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच घरातील व्यक्तींना सहा मिनिटे चालायला सांगण्यात आले. त्यानंतर त्यांची ऑक्सिजन पातळी तपासण्यात आली.
दापोली तालुक्यामध्ये ‘माझी रत्नागिरी-माझी जबाबदारी’ ही मोहीम घरोघर जाऊन राबवण्यात येईल, अशी माहिती यावेळी तहसीलदार वैशाली पाटील व गटविकास अधिकारी आर. एम. दिघे यांनी दिली.
.......................................
दापोली तालुक्यातील १०६ ग्रामपंचायतींत ही मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्याधिकारी यांच्या सूचनांचे पालन करून प्रत्येक गावात ग्रामकृती दलाची टीम तयार करण्यात आली आहे. पुढील १५ दिवसांत ४० हजार कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या मोहिमेमुळे कोरोनाला रोखण्यासाठी चांगला फायदा होणार आहे.
- आर. एम. दिघे, गटविकास अधिकारी, दापाेली.
...........................................
‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी’ या मोहिमेच्या शुभारंभावेळी दापाेली तालुक्यातील जालगाव येथील कुटुंबाची आराेग्य तपासणी करण्यात आली.