संदीप बांद्रे
चिपळूण : चिपळूण शहर परिसराला महापूर किंवा अतिवृष्टी नवीन नाही. मग तो १९३५, १९६५ किंवा २००५चा महापूर असो. त्या महापुराची एक सीमा ठरलेली होती. या सीमेच्या अंदाजाने चिपळुणातील बहुतांशी बांधकामे व विकासकामे केली जातात. २००५ च्या महापुरानंतर येथे एक पूररेषाही निश्चित केली होती. साधारण समुद्रसपाटीपासून १२ मीटर उंचीवर चिपळूण शहर वसले आहे. तरीही २००५ची पूररेषा यापुढे कधीही ओलांडली जाणार नाही, असेच अनेकांना वाटत होते; परंतु यावेळेस पावसाने हे सर्व अंदाज फोल ठरवले आणि होत्याचे नव्हते केले. चिपळूणच्या इतिहासात महापुरामुळे आजपर्यंत कधीही न झालेले नुकसान आज अनुभवास आले. इतकी भीषणता व थरारक अनुभव अनेकांना पहिल्यांदाच आला.
तिवरे येथे २०१९ मध्ये धरणफुटीची घटना घडली होती. त्यावेळी आलेला अनुभव प्रशासनाकडे होता; परंतु तो अनुभव या ढगफुटीत जराही कामी आला नाही. बुधवारी रात्री खऱ्याअर्थाने आठ वाजल्यापासून बाजारपेठेत पुराचे पाणी भरायला लागले होते. बाजारपेठेतील जयंत साडी सेंटर येथे तेव्हा पाणी आले होते. त्यामुळे बाजारपुलाचा मार्ग बंद पडला होता व अनेक जण उक्ताडमार्गे पलीकडे जात होते. यावेळी काही व्यापारी व कामगार दुकाने बंद करून घरी निघाले होते. त्यानंतर रात्री अकरा वाजेपर्यंत चिंचनाका व संपूर्ण बाजारपेठेत पाणी शिरल्याचे समजले. मात्र, त्यानंतर पुराच्या पाण्याचा वेग वाढला आणि पहाटे चार वाजता नगर परिषदेने भोंगा चारवेळा वाजवून नागरिकांना सतर्क केले. त्यामुळे मलाही धडकी भरली. कारण माझी आई वडनाका येथील जनता हॉस्पिटलमध्ये अडकली होती. तेवढ्यात तिचा फोन आला की पाणी वाढतंय, कोणी घराबाहेर पडू नका. त्यावेळी माझ्या गावातील गोवळकोट शिंदेवाडी येथे जाऊन पाहिले तर संपूर्ण शेती पाण्याखाली गेली होती; परंतु हा अनुभव नवीन नव्हता. क्षणाक्षणाला पाण्याची पातळी वाढत होती. त्यामुळे मी काही सहकाऱ्यांना संपर्क साधला असता, कोयनेचे अवजल सोडण्यात येणार असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे गुरुवारी सकाळी १० वाजता पुन्हा पाण्याची पातळी पाहिली असता २००५ची पूररेषा ओलांडली हाेती. मी तत्काळ तहसीलदारांना संपर्क साधला आणि एनडीआरएफची टीम आली का, गोवळकोटमध्ये बोटीची गरज आहे, तळ शेतात ३५ जण अडकले आहेत व अनेक जनावरांचा जीव धोक्यात असल्याचे सांगितले. याचवेळी पेढे कुंभारवाडी येथे दरडीच्या ढिगाऱ्याखाली तिघेजण अडकल्याची माहिती कळली. मात्र, त्यानंतर काही वेळाने मोबाइल नेटवर्कच गायब झाले. त्यातच गोवळकोट रोड येथे दोन जुनाट वृक्ष कोसळल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यानंतर गावाचा चिपळूण शहराशी संपूर्ण संपर्क तुटला. यावेळी काही कामगार कामावर निघाले होते; परंतु रस्त्यावर सहा फुटापर्यंत पाणी होते त्यामुळे ते मागे फिरले. दुपारी १२ वाजेपासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत पाण्याची पातळी स्थिर होती. त्यानंतर दीड ते दोन फुटाने पाण्याची पातळी कमी झाली. परंतु, पुन्हा पातळी वाढली. तोपर्यंत स्थानिक तरुणांनी एका छोट्या बोटीच्या साहाय्याने अक्षरशः जीव धोक्यात घालून ३५ जणांना पुरातून बाहेर काढले. तसेच तीन बंगल्यांतील १७ जण, काही कामगारांना रात्री उशिरा बाहेर काढले. हा थरारक अनुभव घेताना अंगावर शहारे येण्यापलीकडे काही नव्हते. त्यानंतर रात्री १ वाजता अचानक चार फुटाने पाण्याची पातळी वाढली आणि रात्रीच सर्वत्र हाहाकार माजला.
गावातील शेतकऱ्यांच्या पहाटेपासूनच महापुरात बुडालेल्या गोठ्यांकडे नजरा लागल्या होत्या. यावेळी काही शेतकरी माझ्या घरी आले आणि जनावरांचे काय करायचे, असा सवाल केला. ते ऐकून मीही गहिवरून गेलो. यावेळी काहींनी २४ तास होऊन गेल्याने पंचनाम्याची वाट न पाहता, पुराचे पाणी काही प्रमाणात कमी होताच पाण्याच्या प्रवाहात सोडून देण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे शुक्रवारी सकाळी ७ वाजल्यापासून ५० हून अधिक जनावर, शेकडो बकऱ्या पुरात सोडून दिल्या. त्यानंतर काही वेळातच गोवळकोट परिसरातील व शहरातील पुराचे पाणी निघून गेले. मात्र त्यानंतर उरला होता तो केवळ चिखल.