सावर्डे : गेली २० वर्षे सत्तेत असणाऱ्या शिवसेनेने जिल्हा परिषदेची अवस्था एखाद्या कोंडवाड्यासारखी केली आहे. एकही पाणी योजना गेल्या दोन वर्षात झालेली नाही. पालकमंत्री नुसतेच रस्त्याचे नारळ फोडत सुटले आहेत. जिल्ह््याचा नियोजित आराखडा नसल्याने शिक्षण, आरोग्य याबाबत जिल्हा पिछाडीवर आहे. लोकहितकारक योजनांचा बट्ट्याबोळ झालाय. यासाठी अशा लबाड लांडग्यांच्या टोळ्यांना हद्दपार करुन एकदिलाने एकजुटीने काम करुन जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीची सत्ता आणूया, असे प्रतिपादन जिल्हाप्रभारी भास्कर जाधव यांनी केले.आज (रविवारी) राष्ट्रवादी पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीत ते बोलत होते.यावेळी जिल्हा पक्षनिरीक्षक संदेश कोंडविलकर, जिल्हाध्यक्ष शेखर निकम, आमदार संजय कदम, माजी राज्यमंत्री रवींद्र माने, माजी आमदार मुसा मोडक, जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजी चोरगे, बाबाजी जाधव, युवकचे प्रदेश उपाध्यक्ष अजित यशवंतराव, कुमार शेट्ये, बशीर मुर्तुझा, महिलाध्यक्ष चित्रा चव्हाण, जिल्हा परिषदेचे गटनेते अजय बिरवटकर, युवक जिल्हाध्यक्ष राजू आंब्रे, सुभाष मोहिते, सिकंदर जसनाईक आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. भास्कर जाधव पुढे म्हणाले की, पक्षाने जिल्ह््याची जबाबदारी दिल्यानंतर जून महिन्यात मी राजापूरपासून मंडणगडपर्यंत मेळावे घेऊन विधानसभा निवडणुकीनंतर पक्षाला आलेली मरगळ झटकल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली होती. त्यामुळे आपल्यावर अनेक खोटेनाटे आरोप करण्यात आले, असे ते म्हणाले.काही विरोधी पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकारी माझ्या संपर्कातदेखील होते. परंतु, मध्यंतरी नगरपंचायत निवडणुकीत माशी शिंकली आणि पक्षाने अन्य व्यक्तीच्या हातात सुत्रे दिली. मात्र, तरीही मी पक्षाचे काम करत राहिलो. १७ वर्षे ज्या पक्षात गटातटाला सामोरे जावे लागले. जिथे पक्षाचे काही नव्हते तेथेही आपण शाखा निर्माण केली. सत्ता नसताना जो पक्षासाठी काम करतो तोच कार्यकर्ता प्रामाणिक असतो आणि अशा कार्यकर्त्यांना ताकद देणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.आघाडीबाबत बोलताना जाधव म्हणाले की, जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांना सन्मानपूर्वक आघाडी होत असेल तरंच बोलणी करा, असे सांगितले आहे. तसेच तालुकाध्यक्षांना विश्वासात घेऊन यावर योग्य निर्णय घेतला जाईल. (वार्ताहर)
लबाड लांडग्यांच्या टोळ्यांना हद्दपार करा
By admin | Published: January 01, 2017 11:11 PM