अर्ज करण्याचे आवाहन
देवरुख : एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पांतर्गत अंगणवाडीसेविका व मिनी अंगणवाडीसेविका अशी एकूण ११ पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांसाठी अर्ज करण्याचे आवाहन बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे. कडवई, देवरुख वरची आळी, अंत्रवली, डिंगणी गुरववाडी, सरंद, ब्राह्मणवाडी, कोंड्ये मधलीवाडी येथील पदे रिक्त आहेत.
स्पर्धा परीक्षा शिबिर
राजापूर : विद्यानिकेतन व ग्रामीण समाज प्रबोधिनी येळवण यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. राजापूरचे पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर, संस्थाध्यक्ष चंद्रकांत देशपांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी सीमा गांगण, मुख्याध्यापक संभाजी केळुस्कर, पोलीस पाटील, शुभदा सकपाळ उपस्थित होते.
सैन्यभरतीपूर्व प्रशिक्षण
राजापूर : राजापूर शिक्षण प्रसारक मंडळातर्फे ‘यशस्वी भव’ अकादमीची स्थापना करण्यात आली आहे. या अकादमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पोलीस सैन्यभरती पूर्व प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. राजापूर हायस्कूल येथे १ एप्रिलपासून वर्ग सुरू होणार आहेत. युवकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
महासंघाची स्थापना
रत्नागिरी : जिल्हा कुस्ती मल्ल विद्या (महाराष्ट्र राज्य) संघाची सभा आयोजित करण्यात आली होती. जिल्ह्यामध्ये कुस्ती मल्ल विद्येचा प्रसार व्हावा व जिल्ह्यात पैलवान निर्माण व्हावेत, या उद्देशाने या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रत्नागिरी तालुका कुस्ती व मल्ल विद्या अध्यक्ष मारुती गलांडे उपस्थित होते.
उरुस साधेपणाने
रत्नागिरी : फुणगूस येथील प्रसिद्ध दर्गा हजरत शेख जाहीर शेख पीर बाबांचा वार्षिक उरुस दिनांक २६ ते २८ मार्चअखेर साजरा करण्यात येत आहे. कोरोनामुळे शासकीय नियमावलींचे पालन करीत सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले असून, केवळ मानकऱ्यांच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
पूर्वा बाकाळकरची निवड
राजापूर : तालुक्यातील विखारे गोठणे येथील आबासाहेब मराठे आर्ट्स अॅण्ड सायन्स महाविद्यालयाची विद्यार्थिनी पूर्वा बाकाळकर हिची टेनिस क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडियातर्फे पाचव्या सीनिअर वुमन इंटरनॅशनल टेनिस क्रिकेट संघासाठी झाली आहे. मुुंबई संघात निवड होऊन तिने कांस्य पदक पटकावले आहे.
ग्राम बालसंरक्षण प्रशिक्षण
रत्नागिरी : जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयांतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्षातर्फे लांजा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र शिपोशी येथे लांजा तालुकामधील शिपोशी व भांबेड बीटमधील ग्रामबाल संरक्षण समिती सदस्य, सचिव, अंगणवाडीसेविका यांना ग्रामबाल संरक्षण समितीविषयक कामकाजाचे प्रशिक्षण देण्यात आले.
सामूहिक विवाह सोहळा
चिपळूण : तालुका मुस्लीम विकास मंचची स्थापना झाल्यानंतर समाज हिताच्या दृष्टीने कामकाज करण्याचा उद्देश नजरेसमोर ठेऊन काम करण्यात येत आहे. चिपळुणात लवकरच सामूहिक विवाह सोहळा घेण्यात येणार आहे. महागाईमुळे लग्नसमारंभासाठी खर्च न परवडणारे झाले आहे. त्यामुळे समाजातील तरुण-तरुणी यांचा सामूहिक पद्धतीने शरीयतनुसार विवाह सोहळा होणार आहे.
पोलिसांचे संचलन
रत्नागिरी : कोरोनामुळे शिमगोत्सवासाठी शासनाने आचारसंहिता जाहीर केली आहे. याबाबत जांभारी येथे पोलिसांनी संचलन केले. सर्व प्रमुख पदाधिकारी व ग्रामस्थ यांची सभा घेऊन सामाजिक अंतर, मास्क वापरत, सॅनिटायझरचा वापर, तसेच गर्दी टाळण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.