रत्नागिरी : राजर्षी शाहू महाराज परदेशी शिष्यवृत्ती योजनेंतर्गत परदेशातील नामांकित विद्यापीठात उच्चशिक्षण घेण्यासाठी अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते. या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी दि. ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
शिष्यवृत्ती योजनेंतर्गत यापूर्वी अर्ज करण्यासाठी १८ जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, सर्वत्र कोरोनामुळे निर्बंध असल्याने बहुतांश विद्यार्थ्यांना दिलेल्या मुदतीत ‘ऑफर लेटर’ प्राप्त झाले नाही. याबाबत अनेक विद्यार्थ्यांनी सामाजिक न्याय व विशेष साह्य विभागाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे मुदतवाढ देण्याबाबत विनंती केली होती. त्यानुसार सामाजिक न्यायमंत्री मुंडे यांनी विभागाला आदेश देऊन ही मुदत दि. ३० जून २०२१पर्यंत वाढविण्याची सूचना दिली होती. त्यानुसार विभागाकडून ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या निर्णयामुळे अनुसूचित जातीतील इच्छुक विद्यार्थ्यांना दिलासा प्राप्त झाला आहे.
या योजनेंतर्गत महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील पदव्युत्तर पदवी आणि पीएचडीसाठी अद्ययावत क्यूएस वर्ल्ड रँकिंगमध्ये ३००च्या आत क्रमांक मिळवणाऱ्या परदेशी विद्यापीठांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या ७५ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येणार आहे.