लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : शासनाने शेतकऱ्यांना पीक कर्ज परतफेडीसाठी जुलैअखेर मुदतवाढ दिली आहे. शासनाच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना परतफेडीसाठी अवधी प्राप्त झाल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात आंबा उत्पादन ६५ हजार तर काजू उत्पादन ९० हजार हेक्टर क्षेत्रावर आहे. आंबा, काजू उत्पादन घेणारे बहुतांश शेतकरी पीक कर्ज घेतात. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या माध्यमातून पीक कर्जाचा पुरवठा केला जातो. मात्र, पीक कर्ज परतफेडीची मुदत ही जूनअखेर असते. या मुदतीत कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना डाॅ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ मिळतो. प्रोत्साहनपर व्याज सवलतीमुळे विकास संस्था व बॅंकांची वसुली चांगली होते.
कोरोनामुळे एप्रिल व मे महिन्यात लाॅकडाऊन घोषित करण्यात आले होते. यावर्षी हवामानातील बदलामुळे आंबा पीक धोक्यात आले होते. त्यातच मे महिन्यात झालेल्या ताैक्ते वादळामुळे शेवटच्या टप्प्यातील आंबा पीक जमिनीवर आल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले. एकूणच आंबा पीक कमी त्यातच विक्री व्यवस्थेत निर्माण झालेल्या अडचणी, वादळामुळे पिकाचे झालेले नुकसान यामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकरी पीक कर्जाची जून अखेरीस परतफेड करू शकले नव्हते. त्यामुळे बॅंकांच्या वसुलीवर परिणाम झाला आहे.
पीक कर्ज परतफेड करण्यासाठी जुलै २०२१ अखेर मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या वाढीव मुदतीत पीक कर्जाची परतफेड करणारे शेतकरी सरकारच्या डाॅ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ मिळण्यास पात्र असणार आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.