खेड : येथील भूमी अभिलेख कार्यालयातात घुसून कर्मचाऱ्यांना धमकावत पक्ष निधीच्या स्वरूपात २५ लाख खंडणी मागितल्याचा प्रकार समाेर आला आहे. याविरोधात खेड पोलिसस्थानकात फिर्याद दिली असून, पोलिसांनी एकूण १५ जणांविरोधात शासकीय कामात अडथळा व खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही ताब्यात घेण्यात आलेले नाही.खेड येथील भूमी अभिलेख कार्यालयातील भूकरमापक सायली वसंत धोत्रे (३०, मूळ रा. शिरगाव, सध्या रा. रावतळे, चिपळूण) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार ९ जानेवारी २०२२ ते दि.८ मार्च २०२३ रोजी सायंकाळी ४:३० वाजेच्या कालावधीत घडला आहे. याप्रकरणी चंद्रकांत तांबे, प्रदीप कांबळे, प्रणेश मोरे, यासीन परकार व इतर १० अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.खेड तहसीलदारांच्या लेखी पत्रानुसार कोंडिवली बौद्धवाडी येथील जागेतील अतिक्रमण करणाऱ्यावर कारवाई करण्यासाठी मोजणीचे काम सायली धोत्रे व त्यांचे सहकारी शिवानंद टोम्पे यांनी २० जानेवारी २०२२ व ५ एप्रिल २०२२ रोजी केले होते. मात्र, गट क्रमांक १०४ चा नकाशा उपलब्ध न झाल्याने त्याची मोजणी केली नव्हती. याप्रकरणी पंधरा जण सातत्याने भूमी अभिलेख कार्यालयात मोजणी केलेल्यांची कागदपत्रे व नकाशा मागणी करत होते. त्यानंतर दि.२२ फेब्रुवारी २०२३ रोजी उपअधीक्षक कृष्णा शिंदे यांची भेट घेऊन मोजणी मान्य नसल्याचे सांगून फेरमोजणीची मागणी केली. त्यानुसार शिरस्तेदार राजेंद्र रसाळ व बेजगमवार यांनी फेरमोजणी केली.
मात्र, त्याचदिवशी प्रणेश मोरे याने येऊन शिवानंद टोम्पे यांना तुम्ही मोजणी चुकीची केली असून, तुमच्या पाठीमागे तक्रारी अर्ज, उपोषण, पेपरबाजी या गोष्टी होऊ नयेत असे वाटत असेल, तर पक्ष चालवण्यासाठी २५ लाख रुपये द्या, आम्ही सर्व विषय मिटवतो, असे सांगितले.त्यानंतर पुन्हा दि.८ मार्च २०२३ रोजी भूमी अभिलेख कार्यालयात प्रवेश करून २५ लाख न दिल्याचे सांगून शिवीगाळी, दमदाटी करून शिवानंद टोम्पे यांना धक्काबुक्की केली, तसेच शोएब खत्री याने चिंचघर वेताळवाडी येथील रेखांकनामध्ये १२ गुंठे क्षेत्र वाढवून द्या किंवा ६ लाख ५० हजार रुपये द्या, असे बोलून दमदाटी केली, असे म्हटले आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सुजित सोनवणे करत आहेत.