राजापूर : कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी शासनाने बुधवारी रात्रीपासून लागू केलेल्या लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश असल्याने गुरुवारी राजापुरात आलेल्या नागरिकांना तसेच जीवनावश्यक वस्तू विकणाऱ्या व्यापाऱ्यांना शासन निर्देशाचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाने दिल्या. नियमांचे पालन न करणाऱ्या व्यापारी व नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना गुरुवारी राजापूर भेटीवर आलेले उपविभागीय पोलीस अधिकारी निवास साळोखे यांनी दिल्या आहेत.
राजापूर शहर बाजारपेठेत आलेल्या प्रत्येक नागरिकाची पोलिसांकडून खातरजमा करण्यात येत होती. अनावश्यक गर्दी होऊ नये तसेच जीवनावश्यक वस्तूंशिवाय अन्य दुकाने पूर्णपणे बंद राहतील या दृष्टीने पोलीस प्रशासन कार्यवाही करत आहे.
जवाहर चौक, जकात नाका, मच्छीमार्केट, आदी महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. महत्त्वाच्या कामाशिवाय बाजारपेठेत येण्यास नागरिकांना प्रतिबंध करण्यात येत आहे. तसेच नगर परिषद प्रशासनाकडून नागरिकांना ध्वनिप्रक्षेपाद्वारे सूचना दिल्या जात आहेत.
राजापूर शहर बाजारपेठेत गुरुवारी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्व दुकाने, हॉटेल, पानटपऱ्या, बेकरी पूर्णपणे बंद ठेवली होेती.
शासकीय कार्यालये व बँका सुरू असल्या तरी या ठिकाणीही तुरळक गर्दी हाेती.
..................................
जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणाऱ्या दुकानदारांना व कामगारांना आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे, तर ४५ वर्षांवरील व्यापारी व कामगार यांनी लसीकरण करून घेणेही बंधनकारक केले आहे. मात्र, राजापूर ग्रामीण रुग्णालयात पुरेसा लससाठा नसल्याने तीही करता येत नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांमधून प्रशासनाच्या या धोरणाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.