रत्नागिरी : दापाेली नगरपंचायतीतील काेट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचारप्रकरणी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नगरसेवक अन्वर रखांगे यांचा मुलगा फैजान रखांगे याला रत्नागिरी जिल्हा आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखेकडून अटक करण्यात आली आहे. ही कारवाई रविवारी (९ एप्रिल) रात्री ८ वाजण्याच्या सुमाराला करण्यात आली. भ्रष्टाचारप्रकरणी निलंबित केलेल्या लेखापाल दीपक सावंत याने त्याच्या खात्यात दीड काेटीपेक्षा अधिक रक्कम वर्ग केल्याचे समाेर आले आहे. त्यामुळे त्याला चाैकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.दापोली नगरपंचायतीचे माजी कर्मचारी निलंबित लेखापाल दीपक सावंत याने नगरपंचायतीमध्ये कोट्यवधी रुपयांचा आर्थिक भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. या भ्रष्टाचारप्रकरणी पोलिसांनी त्याला यापूर्वीच अटक केली होती. सध्या ताे जामिनावर बाहेर आहे. याच कथित भ्रष्टाचार प्रकरणात राष्ट्रवादीच्या नगरसेवकाच्या मुलाचा नंबर लागल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.या प्रकरणाचा तपास जिल्हा आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपवण्यात आला आहे. याच प्रकरणात फैजान रखांगे यांच्या खात्यावर दीपक सावंत याने जवळपास दीड कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम वर्ग केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक फैजान रखांगे यांच्या अटकेसाठी लक्ष ठेवून होते. मात्र, फैजान गेले काही दिवस भारताबाहेर गेल्याची चर्चा होती. मात्र, ताे दापोलीत येताच पथकाने त्याला अटक केली.
दापोलीतील राष्ट्रवादीच्या नगरसेवकाच्या मुलाला अटक, नेमकं प्रकरण काय...जाणून घ्या
By अरुण आडिवरेकर | Published: April 10, 2023 3:45 PM