रत्नागिरी : ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. सर्वसामान्यांची ऑनलाईन फसवणूक असताना चक्क ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या भामट्याने रत्नागिरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या नावाने बनावट अकाऊंट उघडून त्याद्वारे पैशाची मागणी केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. या भामट्यापासून सर्वांनी सावध राहण्याचे आवाहन गणेश इंगळे यांनी केले आहे.या भामट्याने रत्नागिरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांचे बनावट फेसबुक अकाऊंट तयार केले आहे. त्याद्वारे त्याने रत्नागिरीतील अनेकांना फेसबुकवर मेसेज पाठवीत पैशाची मागणी केली आहे. या फेसबुक अकाऊंटला गणेश इंगळे यांचा फोटोही लावण्यात आला आहे. त्यामुळे अनेकांचा यावर विश्वास बसत आहे.मात्र, हे बनावट अकाऊंट असल्याचे गणेश इंगळे यांनी सांगितले आहे. हा भामटा ज्या मोबाईवर संपर्क करायला सांगत अ़ाहे, ज्या बँक अकाऊंटवर पैसे भरायला सांगत आहे त्याची माहिती त्वरित पोलिसांना द्यावी व तपास कार्यात मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
माझा फोटो व नाव वापरून कोणीतरी फेक फेसबुक अकाऊंट तयार केलेले आहे. त्याद्वारे फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून पैशाची मागणी केली जात आहे. कृपया अशी रिक्वेस्ट पुन्हा स्वीकारू नये किंवा फ्रेंड झाला असाल तर कृपया संबंधित फ्रॉड व्यक्तीला पैसे किंवा इतर मदत करू नये.- गणेश इंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, रत्नागिरी.