खेड : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रवेशद्वार असलेल्या कशेडी घाटात व तुळशी - विन्हेरे चेक पोस्टवर जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक खासगी वाहनाची कसून तपासणी करण्यात येत आहे. शुक्रवारी मध्यरात्रीपासून शनिवारी सायंकाळपर्यंत दोन्ही चेकपोस्टवर करण्यात आलेल्या तपासणीदरम्यान ५ खासगी आराम बसच्या चालकांकडे बनावट ई-पास व क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी आढळून आल्याने येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुंबईहून जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून तपासणी करण्यात येत आहे. कशेडी घाटाला पर्याय असलेल्या विन्हेरे तुळशी मार्गाचा वापर जिल्ह्यात येण्यासाठी केला जातो. या मार्गावर असणाऱ्या चेकपोस्टवर पाच खासगी प्रवासी वाहनांवर बनावट ई-पास व शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसात सुगंधा ट्रॅव्हल्सच्या (एमएच ४६ एवाय ४९०८) या बसच्या सतीश विचारे (नवीमुंबई), अनिल वळंजु (नालासोपारा), रिया ट्रॅव्हल्सच्या (एमएच ०१ सीआर ८६८५) जयप्रकाश पांचाळ (उंबर्डे, वैभववाडी, सिंधुदुर्ग), वैभव खटावकर ( पाचल, राजापूर), सुनील कारखे (नवीमुंबई) व रुद्रदेवी ट्रॅव्हल्स (एमएच ०४ जे ००९९) सतीश पाडलेकर (विरार), राकेश अनंत भारती (नालासोपारा), खासगी ट्रॅव्हलर एमएच ०४ जीपी १२९९ व एमएच ०४ जीपी ३१०५ चे चालक, मालक व त्यांना बनावट ई-पास बनवून देण्यास मदत करणाऱ्या अशा आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
यामध्ये हितेश गणपत बेलकर (भोईसर, कांदिवली पश्चिम), राजेश सीताराम डफळे (साखरपा, ता. संगमेश्वर), हुसेन याकुब अन्सारी (काशीमिरा, मीरा रोड, ठाणे), जितेंद्र जगदीश मोरे (वसुबाई सोसायटी, कांदिवली पश्चिम) व मंगेश बाईत (विलेपार्ले, मुंबई) व नरेश मनोहर शिंदे (साखरपा, ता. संगमेश्वर), सुहास नारायण बाईंग (भोवडे, ता. संगमेश्वर) व महेश बाईंग (रा. पार्ले, मुंबई) यांचा समावेश आहे.
याव्यतिरिक्त महाड तुळशी विन्हेरे मार्गाने बनावट ई पासचा वापर करून जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या तीन वाहनांवर चेकपोस्ट पोलिसांनी कारवाई करून आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, कारवाई केलेली वाहने येथील गोळीबार मैदानात उभी करण्यात आली आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे, पोलीस उपनिरीक्षक सुजित सोनावणे यांनी केली.
------------------------
बनावट ई पासचा वापर करून जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या वाहनांवर कारवाई करून खेड शहरातील गोळीबार मैदानात उभी करून ठेवण्यात आली आहेत. (छाया : हर्षल शिराेडकर)