रत्नागिरी : रत्नागिरीत झालेल्या बनावट नोटांच्या छपाईतील नवनवी माहिती आता पुढे येत आहे. चार लाखांच्या बनावट नोटा छापण्यासाठी एक लाख मिळत असल्याने प्रसाद राणे याने पाच महिन्यांत बनावट साडेसात लाख रुपये छापले आहेत. याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आतापर्यंत सात जणांना अटक केली असून, आणखीही काही लोक लवकरच पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे.रत्नागिरी एमआयडीसीमधील प्रिंटिंग प्रेसमध्ये प्रसाद राणे याने मार्च ते जुलै २०२४ या कालावधीत एकूण ७ लाख ३६ हजार रुपयांच्या नोटा छापल्या. या नोटा ५००, २०० आणि १०० या प्रकारच्या होत्या, अशी माहिती मुंबई गुन्हे शाखेच्या तपासात पुढे आली आहे. ४ लाखांच्या बनावट नोटांच्या छपाईसाठी त्याला इतर संशयित आरोपींकडून १ लाख रुपयांचे कमिशन मिळत असल्यामुळे कमी कालावधीत श्रीमंत होण्यासाठी त्याने हा मार्ग अवलंबला होता, असेही तपासात पुढे येत आहे.
काही दिवसांपूर्वी मुंबई मानखुर्द येथे मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चार जणांना बनावट नोटांसह अटक केली होती. त्यांच्याकडील चौकशीत त्यांना एका पतसंस्थेचा शाखा व्यवस्थापक अमित कासार याचे नाव समजले.कासारला ताब्यात घेऊन पोलिसांनी कसून चौकशी कली. बनावट नोटांची छपाई रत्नागिरीतील एमआयडीसी येथे प्रसाद राणे आपल्या प्रिंटिंग प्रेसमध्ये करत असल्याची माहिती कासार याने पोलिसांना दिली. पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री प्रसाद राणेच्या घरी धाड टाकून त्याचे प्रिंटिंग मशीनही जप्त केले आहे.