आरवली : संगमेश्वर तालुक्यातील कडवई प्राथमिक आरोग्य केंद्रामधील वैद्यकीय अधिकारी डॉ. मुंढे यांना जाब विचारण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थांबरोबर त्यांची बाचाबाची झाली होती. मात्र, डॉ. मुुंढे यांनी यावेळी मारहाण झाल्याची खोटी तक्रार दाखल केल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांनी म्हटले आहे.कडवई प्राथमिक आरोग्य केंद्रात शेनवडे येथील एक महिला विंचूदंश झाल्याने उपचारासाठी आली होती. यावेळी दवाखान्यामध्ये एकही कर्मचारी उपस्थित नव्हता. आजूबाजूला पाहिले असता, एका खोलीमध्ये डॉ. मुंढे व अन्य कर्मचारी हे गप्पा मारत बसले होते. त्यावेळी गणेश ब्रीद यांनी रुग्ण गंभीर असून, त्याला तपासण्याची विनंती केली असता, आता आमची जेवणाची वेळ झाली असून, नंतर पेशंट तपासतो असे डॉ. मुुंढे यांनी सांगितले, अशी माहिती जितेंद्र चव्हाण यांनी दिली. डॉ. मुंढे यांनी तुम्हाला गडबड असल्यास रुग्णाला अन्य ठिकाणी घेऊन जा, असेही सांगितले. यावर ग्रामस्थ व डॉ. मुंंढे यांच्यामध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर रुग्णालयाच्या आवारात ग्रामस्थांची गर्दी जमली. यानंतर डॉ. मुंढे यांनी आपल्याला चोवीस तास नोकरी करणे शक्य नसल्याचे सांगितले, असे जितेंद्र चव्हाण यांनी सांगितले. याबाबत आपण वरिष्ठांशी चर्चा करा, मात्र रुग्णांना योग्य ती सेवा द्या, असे चव्हाण यांनी डॉ. मुंढे यांना सांगितले. यावर आपल्याला नोकरीची गरज नसून, आपण पंधरा दिवसांपूर्वीच नोकरीचा राजीनामा दिलेला आहे, असे डॉ. मुंढे यांनी सांगितले.यानंतर चव्हाण यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. व्ही. आर. रायभोळे यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी हा विषय सामंजस्याने सोडवावा, असे डॉ. रायभोळे यांनी सांगितल्याने हे प्रकरण मिटविण्यात आले होते, असे चव्हाण यांनी सांगितले.मात्र, त्यानंतरही डॉ. मुंढे यांनी मारहाणीची तक्रार दाखल केल्याने आश्चर्य वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. रात्री संबंधित डॉक्टर हे नशेत असल्याने त्यांनी त्यावेळी तक्रार दाखल केली नसल्याचा आरोपही जितेंद्र चव्हाण यांनी यावेळी बोलताना केला. वैद्यकीय अधिकाऱ्यांना वेळीच आरोग्य विभागाकडून आवर घातला गेला नाही तर ग्रामस्थांकडून याविरोधात आंदोलन छेडले जाईल, असा इशारा ग्रामस्थांच्यावतीने जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांनी दिला आहे. (वार्ताहर)
वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून खोटी तक्रार
By admin | Published: May 01, 2016 12:11 AM